ICC Cricket World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील लढतीने आज (गुरुवारी) आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ८ ऑक्टोबरला होणार आहे. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस दुखापतीशी झुंजत आहे. अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसला दुखापत झाल्याने भारताविरुद्ध खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. शानदार फलंदाजीसोबतच स्टॉइनिस वेगवान गोलंदाजीनेही विरोधी संघाला अडचणीत आणतो. गेल्या महिन्यात, भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, स्टॉइनिसने हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो शेवटच्या ४ सामन्यांमध्ये खेळला नाही. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतही ऑस्ट्रेलियाचा १-२ असा पराभव झाला होता.
फॉक्सस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, मार्कस स्टॉइनिस भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर असू शकतो. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या महिन्यात मोहालीत भारताविरुद्ध स्टॉइनिसला दुखापत झाली होती. याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडलाही दुखापत झाली असून तो विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. हेडच्या जागी मिचेल मार्शने भारताविरुद्धच्या मालिकेत डेव्हिड वॉर्नरसोबत सलामी दिली होती. मार्शनेही चांगली कामगिरी केली.
हेही वाचा – World Cup 2023: जर पॉइंट आणि नेट रनरेटही समान असल्यास कोणता संघ क्वालिफाय ठरतो? जाणून घ्या वर्ल्डकपचे नियम
कॅमेरून ग्रीनला मिळू शकते संधी –
अँड्र्यू मॅकडोनाल्डने सांगितले की, तरीही त्याला पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेले नाही. सराव सामन्यात आम्ही कोणताही धोका पत्करला नाही आणि मार्कस स्टॉइनिसला विश्रांती दिली. स्टॉइनिस खेळणार की नाही याचा निर्णय पुढील काही सराव सत्रांनंतरच घेतला जाणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी स्टॉइनिस फिट नसेल, तर अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला संधी मिळू शकते. याशिवाय मार्नस लाबुशेनही खेळणार हे जवळपास निश्चित आहे. अॅस्टन आगरला दुखापत झाल्यानंतर अखेरच्या क्षणी लाबुशेनला संघात स्थान मिळाले.
मार्कस स्टॉइनिसची एकदिवसीय कारकीर्द –
मार्कस स्टॉइनिसने वनडे फॉरमॅटमध्ये ९४.०२च्या स्ट्राइक रेटने आणि २७.४५च्या सरासरीने १४०० धावा केल्या आहेत. मार्कस स्टॉइनिसचे वनडे कारकिर्दीत एक शतक आहे. याशिवाय मार्कस स्टॉइनिसने वनडे फॉरमॅटमध्ये ६ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. स्टॉइनिसने गोलंदाज म्हणून ४४ बळी घेतले आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी ४३.५५ होती, तर इकॉनॉमी ५.९३ होती. तसेच या गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी १६ धावांत ३ बळी आहे.