ऑस्ट्रेलियन खुल्या  टेनिस स्पर्धेच्यावेळी मी उत्तेजक चाचणीत दोषी ठरले होते, अशी धक्कादायक कबुली टेनिस स्टार मारिया शारापोव्हा हिने दिली आहे. मारियाने सोमवारी पत्रकारपरिषद घेऊन यासंबंधीची घोषणा केली. यावेळी तिने या चुकीसाठी मीच सर्वस्वी जबाबदार असल्याचेही म्हटले. या कबुली जबाबामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने मारियावर दीर्घकाळाची बंदी घातल्यास तिची टेनिस कारकीर्द कायमची संपुष्टात येऊ शकते. मला माहिती आहे की, मला या सगळ्याच्या परिणांमाना तोंड द्यावे लागणार आहे. मला माझी कारकीर्द अशाप्रकारे संपवायची नाही. त्यामुळे मला आशा आहे की, मला आणखी एक संधी दिली जाईल, असे शारापोव्हाने म्हटले.
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्यावेळी २८ वर्षीय शारापोव्हाच्या उत्तेजक चाचणीत मेल्डोनियम हा घटक आढळून आला होता. मात्र, गेली दहा वर्षे मी आरोग्याच्या समस्येसाठी मेल्डोनियम असलेल्या औषधांचे सेवन करत असल्याचे तिने सांगितले. रशियन अॅथलिटसकडून मोठ्या प्रमाणावर सेवन करण्यात येणाऱ्या मेल्डोनियमचा याचवर्षीपासून प्रतिबंधित घटकांच्या सूचीत समावेश करण्यात आला होता. मात्र, याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचा दावा शारापोव्हाने केला आहे.मी या चुकीची जबाबदारी स्विकारते. माझे हे कृत्य माझ्या चाहत्यांसाठी आणि मी वयाच्या चौथ्या वर्षीपासून मनापासून खेळत असलेल्या खेळासाठी मान खाली घालणार असल्याचे यावेळी शारापोव्हाने म्हटले.

Story img Loader