मेलडोनियम या प्रतिबंधित उत्तेजकाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने अव्वल टेनिसपटू मारिया शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान, बंदीविरोधात शारापोव्हाने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी महिन्यात वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत शारापोव्हाची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. मार्च महिन्यात पत्रकार परिषदेद्वारे या चाचणीत दोषी आढळल्याचे शारापोव्हाने जाहीर केले.
वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून गेली दहा वर्षे मेलडोनियमचा समावेश असलेले औषध घेत होते, अशी कबुली शारापोव्हाने दिली. १ जानेवारीपासून जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) मेलडोनियमचा प्रतिबंधिक उत्तेजकांमध्ये समावेश केला. यासंदर्भात ‘वाडा’ने तसेच आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने टेनिसपटूंना इमेलद्वारे माहिती दिली. हा ई-मेल पाहिला. मात्र तांत्रिक तपशील जाणून घेतला नाही असे शारापोव्हाने स्पष्ट केले.
शारापोव्हाचे वकील जॉन हागॅर्टी यांनी शारापोव्हाने १ जानेवारीनंतर शारापोव्हाने मेलडोनियमचे सेवन केल्याचे सांगितले. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शारापोव्हाने जाणीवपूर्वक फसवणूक केली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी तिचीच आहे आणि खेळभावनेला बट्टा लावणारा हा गंभीर गुन्हा असल्याने टेनिस संघटनेने दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेदरम्यानच्या चाचणीनंतर मॉस्को येथे २ फेब्रुवारीला घेण्यात स्वतंत्र उत्तेजक चाचणीतही शारापोव्हा दोषी आढळल्याचे स्पष्ट झाले. हृदयविकारासंबंधित आजारी व्यक्तींना मेलडोनियमची मात्रा असलेले औषध देण्यात येते. युरोपातील लॅटव्हिआ देशातील कंपनी या औषधाची निर्मित्ती करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध घेता येते. मात्र औषधाची निर्मित्ती करणाऱ्या कंपनीने या औषधाचे सेवन तीन महिनेच करणे योग्य असे जाहीर केल्याने शारापोव्हाचा दावा कमकुवत झाला. टेनिस संघटनेच्या आचारसंहितेनुसार उत्तेजक सेवनप्रकरणी दोषींसाठी चार वर्षांच्या बंदीची तरतूद आहे. मात्र शारापोव्हाने स्वत:हून चुकीची कबुली दिल्याने तसेच वाडाने मेलडोनियमसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनामुळे शारापोव्हाच्या शिक्षेचा कालावधी
कमी झाला. तीन सदस्यीय शिष्टमंडळासमोर शारापोव्हा प्रकरणाची सुनावणी झाली.
दोन वर्षांच्या बंदीमुळे २९ वर्षीय शारापोव्हाच्या कारकीर्दीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘सौंदर्यवती टेनिसपटू’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहिरातींद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूंच्या मांदियाळीत सामील शारापोव्हा दोन वर्षांनंतर कोर्टवर परतणार का, हा खरा प्रश्न आहे.

Story img Loader