रडवान्स्काला पराभवाचा धक्का
जेतेपदासाठी दावेदार असणाऱ्या मारिया शारापोव्हाने संघर्षपूर्ण विजय मिळवत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. अन्य लढतीत चौथ्या मानांकित अ‍ॅग्निेझेस्का रडवान्स्काला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. सिमोना हालेप आणि अँजेलिक्यू कर्बर यांनी आपापल्या लढती जिंकत तिसरी फेरी गाठली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या व्हीनस विल्यम्सने दणदणीत विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तसेच पुरुषांमध्ये स्टॅनिसलॉस वॉवरिंकाने तिसरी फेरी गाठली.
यंदाच्या वर्षांत शारापोव्हाने फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पोतडीत आणखी एक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी शारापोव्हा आतूर आहे. मात्र तिसरी फेरी गाठण्यासाठी तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. शारापोव्हाने रोमानियाच्या अलेक्झांड्रा डलघेरूवर ४-६, ६-३, ६-२ अशी मात केली. अलेक्झांड्राने पहिला सेट जिंकत सनसनाटी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर  शारापोव्हाने आपला खेळ सुधारत पुढच्या दोन्ही सेटसह सामना जिंकला.
चीनच्या बिगरमानांकित शुआई पेंगने रडवान्स्काला ६-३, ६-४ असे नमवत खळबळजनक विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या सिमोना हालेपने अवघ्या तासाभरात स्लोव्हाकियाच्या जाना सेपलोव्हाचे आव्हान ६-२, ६-१ असे परतावून लावले. सेपलोव्हाने २-० अशी बढत मिळवली होती मात्र त्यानंतर पुढच्या १३ पैकी १२ गुणांवर कब्जा करत तिने बाजी मारली.
जर्मनीच्या सहाव्या मानांकित अँजेलिक्यू कर्बरने रशियाच्या अला क्रुडयाव्हेत्सेव्हाचा ६-२, ६-४ असा पराभव करत तिसरी फेरी गाठली, तर व्हीनस विल्यम्सने तिमिआ बॅसिन्झ्सकीचा ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला. स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिंकाने थॉमझ बेलुसीवर ६-३, ६-४, ३-६, ७-६ अशी मात केली.

वॉवरिंकाचा प्रेक्षकाशी वाद
स्टॅनिसलॉस वॉवरिंकाला तिसरी फेरी गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. या सामन्यादरम्यान त्याला एका अतिउत्साही प्रेक्षकाचाही सामना करावा लागला. मद्यपान करून वावरणाऱ्या प्रेक्षकाला वॉवरिंकाले गप्प राहण्यास सुनावले. ‘‘तो मद्यपान करून आला होता. त्याला समज देणे आवश्यक होते. असे प्रसंग घडू शकतात. प्रत्येकजण रंगतदार सामन्याचा आनंद घेत होता. या घटनेचा खेळावर परिणाम होऊ दिला नाही,’’ असे वॉवरिंकाने सांगितले.

सामना सुरू झाला तेव्हा वातावरण प्रचंड उष्ण होते, हळूहूळ ते कमी होत गेले. या बदलाशी जुळवून घेताना थोडा वेळ गेला. हा कठीण सामना होता, त्यात विजय मिळवता आल्याने समाधानी आहे.
-मारिया शारापोव्हा

Story img Loader