जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स यांनी फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मात्र गतविजेत्या मारिया शारापोव्हाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. ल्युसी साफारोव्हाने द्वितीय मानांकित शारापोव्हावर मात करत खळबळजनक विजयाची नोंद केली.
चुरशीच्या लढतीत तेराव्या मानांकित साफारोव्हा हिने शारापोव्हा हिच्यावर ७-६ (७-३), ६-४ असा निसटता विजय मिळविला. शारापोव्हाला सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण राखता आले नाही. त्याचा पुरेपूर फायदा घेत साफारोव्हा हिने या स्पर्धेत प्रथमच उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. तिला आता स्पेनच्या गर्बिन मुगुरुझा हिच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. गर्बिन हिने फ्लेव्हिया पेनेट्टा हिचा ६-३, ६-४ असा सहज पराभव केला.
‘साफारोव्हाची सव्र्हिस तोडण्याची संधी मला मिळाली होती, मात्र त्याचा फायदा मला घेता आला नाही. माझ्यापेक्षा साफारोव्हाच्या खेळात सातत्य होते. तसेच तिच्या खेळात आक्रमकता अधिक होती. विजयाचे सारे श्रेय तिलाच द्यावे लागेल’, असे शारापोव्हाने सांगितले. अव्वल मानांकित सेरेनालाही विजयासाठी झगडावे लागले. सेरेनाने संघर्षमय लढतीत अमेरिकेच्याच युवा स्लोअन स्टीफन्सवर ६-१, ५-७, ६-३ अशी मात केली. सेरेना हिने पहिला सेट एकतर्फी जिंकला मात्र दुसऱ्या सेटमध्ये तिचा खेळ विस्कळित झाला. त्याचा फायदा घेत स्टीफनी हिने हा सेट घेत सामन्यातील उत्कंठा वाढविली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सेरेना हिने पासिंग शॉट्सचा सुरेख खेळ करीत सव्र्हिसब्रेक मिळविला. याच ब्रेकच्या आधारे तिने विजयश्री मिळविली.
फेडररने स्थानिक प्रतिस्पर्धी गेल मोन्फील्सवर ६-३, ४-६, ६-४, ६-१ असा विजय मिळवला. फेडरर याने फोरहँड व बॅकहँड अशा दोन्ही फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने बिनतोड सव्र्हिसचाही चांगल्या पद्धतीने उपयोग केला. डेव्हिड फेररने मारीन चिलीचवर ६-२, ६-२, ६-४ अशी मात केली. अँडी मरेने जेरेमी चार्डीचा ६-४, ३-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने यजमान रिचर्ड गॅस्क्वेटला ६-१, ६-२, ६-३ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. लाल मातीचा बादशाह असलेल्या राफेल नदालने अमेरिकेच्या जॅक सॉकवर ६-३, ६-१, ५-७, ६-२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत नदालसमोर जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे.
आम्ही जातो अमुच्या गावा..
जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स यांनी फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-06-2015 at 01:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maria sharapova loses but serena williams survives at french open