लाल मातीचा टिळा सलग दुसऱ्या वर्षी आपल्या माथी लावण्यासाठी टेनिसमधील सौंदर्यसम्राज्ञी मारिया शारापोव्हा उत्सुक आहे. शुक्रवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत तिने रंगतदार लढतीत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिला ६-१, २-६, ६-४ अशा फरकाने पराभूत केले. तिची अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सशी गाठ पडणार आहे.
द्वितीय मानांकित शारापोव्हा हिने पहिल्या सेटमध्ये फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ करीत दोन वेळा सव्र्हिसब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये अझारेन्का हिला सूर गवसला. तिने सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवले. तिने शारापोव्हाची सव्र्हिस ब्रेक करण्यात यश मिळविले. या ब्रेकच्या आधारे तिने हा सेट घेतला आणि सामन्यात उत्सुकता निर्माण केली.
निर्णायक सेटमध्ये रशियन खेळाडू शारापोव्हा हिने दोन वेळा सव्र्हिसब्रेक मिळवीत ५-२ अशी आघाडी घेतली. आठव्या गेममध्ये स्वत:च्या सव्र्हिसवर सामना जिंकण्याची संधी तिला मिळाली होती. मात्र अझारेन्का हिने जिद्दीने खेळ करीत तिला झुंजविले. हा गेम घेत तिने रंगत आणखी वाढविली. पाठोपाठ तिने स्वत:ची सव्र्हिसही राखली. तथापि, दहाव्या गेममध्ये शारापोव्हा हिने केलेल्या बिनतोड व वेगवान सव्र्हिसपुढे अझारेन्का हिचा बचाव निष्प्रभ ठरला. या गेमनिशी शारापोव्हाने सामना जिंकला.
सेरेनाकडून साराचा धुव्वा
माजी विजेत्या सेरेनाने झंझावती खेळाचा प्रत्यय घडवित इटलीच्या सारा इराणी हिचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडविला आणि अंतिम फेरीत स्थान पटकावले. पहिल्या सेटमध्ये सारा हिला एकही सव्र्हिस राखता आली नाही. दुसऱ्या सेटमधील चौथ्या गेमच्या वेळी तिने सव्र्हिस राखली. हा अपवाद वगळता या सामन्यात सेरेनाचेच निर्विवाद वर्चस्व होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा