सौंदर्यवती टेनिसपटू मारिया शारापोव्हाने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत संघर्षमय विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत आगेकूच केली. तसेच कॅनडाच्या इग्युेन बोऊचार्डने स्पेनच्या कार्ला सुआरेझला नमवत उपांत्य फेरी गाठली. फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती कॅनडाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
सेरेना विल्यम्स, लि ना आणि अ‍ॅग्निेझेस्का रडवानस्का या तिन्ही अव्वल मानांकित खेळाडूंनी झटपट गाशा गुंडाळल्यामुळे मारिया शारापोव्हाला जेतेपदाची सर्वोत्तम संधी आहे. सातव्या मानांकित शारापोव्हाने स्पेनच्या उदयोन्मुख गारबिन म्युगुरुझावर १-६, ७-५, ६-१ अशी मात केली. गारबिनने पहिला सेट जिंकत सनसनाटी सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये शारापोव्हाने लौकिकाला साजेसा खेळ करत गारबिनला टक्कर दिली. गारबिनने घेतलेली ५-४ आघाडी मोडून काढत शारापोव्हाने बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये शारापोव्हाच्या झंझावाती खेळासमोर गारबिनच्या हातून खुप चुका झाल्या. या चुकांचा फायदा उठवत शारापोव्हाने तिसरा सेट एकतर्फी जिंकत सामन्यावर कब्जा केला. सलग चौथ्या वर्षी शारापोव्हाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.  
बोऊचार्डने सुआरेझवर ७-६ (७-४), २-६, ७-५ असा विजय मिळवत जेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारणारी ती कॅनडाची केवळ तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिन्ही सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या बोऊचार्डने पहिल्या आणि तिसऱ्या सेटमध्ये सरशी साधत बाजी मारली. यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत बोऊचार्डने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला जेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या मारिया शारापोव्हाशी होणार आहे. ‘‘मी खूपच आनंदी आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. ही वाटचाल निव्वळ अविश्वसनीय आहे,’’ असे बोऊचार्डने सांगितले.
लाल मातीवरच्या नदालच्या हुकूमशाहीला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने उपांत्य फेरीत आगेकूच केली. द्वितीय मानांकित जोकोव्हिचने आठव्या मानांकित मिलास राओनिकवर ७-५, ७-६ (७-५), ६-४ असा विजय मिळवला. रॉजर फेडरलला पराभवाचा धक्का देणाऱ्या लॅटव्हिआच्या इर्नेस्ट गुलबिसने टॉमस बर्डीचवर ६-३, ६-२, ६-४ अशी मात करत दिमाखदार विजय मिळवताना उपांत्य फेरीत स्थान पटकावले.

सानिया-कॅरा जोडी पराभूत
पॅरिस : सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅक जोडीला फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. स्यु वेई हेसह आणि शुआई पेंग जोडीने सानिया-ब्लॅक जोडीवर ६-२, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. सानिया-ब्लॅक जोडीचा स्यु-पेंग जोडीविरुद्ध झालेला हा तिसरा पराभव आहे. याआधी इंडियन वेल्स आणि माद्रिद स्पर्धेत सानिया-ब्लॅक जोडीचे आव्हान स्यू-पेंग जोडीनेच संपुष्टात आणले होते. तीन तास चाललेल्या लढतीत सानिया-ब्लॅक जोडीला आठपैकी केवळ तीन ब्रेकपॉइंट्सचा उपयोग करून घेता आला. सानियाच्या पराभवासाह स्पर्धेतील भारताचे अ व्हानही संपुष्टात आले आहे. मिश्र दुहेरीत सानिया आणि तिचा रोमानियाचा साथीदार होरिआ टेकाऊ जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. रोहन बोपण्णाचा मिश्र तसेच पुरुष दुहेरीत पराभव झाला होता.

Story img Loader