खांद्याच्या दुखापतीतून सावरत चार महिन्यांच्या कालावधीनंतर मारिया शारापोव्हाने मैत्रीपूर्ण सामन्याच्या निमित्ताने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. मात्र स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमनाच्या दृष्टीने हे छोटेसे पाऊल असल्याचे शारापोव्हाने सांगितले. शारापोव्हाने सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोव्हिकविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळला. हा सामना अ‍ॅनाने ६-१, १-६, १२-१० असा जिंकला. ऑगस्ट महिन्यात सिनसिनाटी स्पर्धेदरम्यान पहिल्या फेरीत अनपेक्षित पराभवानंतर शारापोव्हाने खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. ‘‘इतके दिवस न खेळल्यानंतर अ‍ॅनाविरुद्धचा सामना म्हणजे एक छोटेसे पाऊल पुढे म्हणायला हरकत नाही. या सक्तीच्या विश्रांतीच्या कालावधीत मला टेनिसाची सातत्याने उणीव जाणवली. भारावून टाकणाऱ्या प्रतिसादाबद्दल कोलंबियातील चाहत्यांचे मी मनापासून आभारी आहे,’’ असे शारापोव्हाने आपल्या ‘ट्विटर’वर  म्हटले आहे.
उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे शारापोव्हाला यंदाच्या हंगामात अमेरिकन खुली स्पर्धा आणि वर्षअखेरीस होणाऱ्या डब्ल्यूटीए अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.
ब्रिस्बेन येथे ३० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेद्वारे शारापोव्हा स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करणार आहे.