तिसऱ्या मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हाने उजव्या पायाच्या दुखापतीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेतून माघार घेतली आहे. शारापोव्हाच्या या निर्णयामुळे ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी सज्ज असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा मार्ग मोकळा झाला असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिकन खुल्या स्पध्रेचे संचालक डेव्हिड ब्रेवर यांनी शारापोव्हाच्या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे रशियाच्या डॅरीआ कॅसात्कीनाला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. ‘‘दुर्दैवाने मला यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत सहभाग घेता येणार नाही,’’ असे ट्विट करून शारापोव्हाने खंत व्यक्त केली. तिने लिहिले की, ‘‘या स्पध्रेत सहभाग घेण्याकरिता मी सर्वतो प्रयत्न केला, परंतु त्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. चाहत्यांना मी विश्वास देऊ इच्छिते की काही आठवडय़ांत मी पुन्हा कोर्टवर दिसेन आणि वर्षांचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेन.’’
सेरेनाच्या जेतेपदाच्या मार्गात शारापोव्हाचाच मोठा अडथळा समजला जात होता आणि उपांत्य फेरीत या दोघीही आमनेसामने येण्याची शक्यता होती. मात्र, आता ३३ वर्षीय सेरेनासमोर उपांत्य फेरीत सातव्या मानांकित सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोव्हिकचे आव्हान असेल. अमेरिकन खुली स्पर्धा जिंकून सेरेना ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाचा वर्तुळ पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. चारही ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याची देदीप्यमान कामगिरी १९८८मध्ये स्टेफी ग्राफ हिलाच करता आली होती. तसेच ग्राफ यांच्या एकेरीतील २२ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्याची संधीही सेरेनाला मिळणार आहे.
विम्बल्डनच्या उपान्त्य फेरीत सेरेनाकडून पराभव पत्करल्यानंतर शारापोव्हा दुखापतीमुळे एकाही स्पध्रेत सहभागी झाली नव्हती. ‘‘या दुखापतीशी दिवसेंदिवस झगडावे लागत आहे. हे दुखणे सलत आहे,’’ असे शारापोव्हा म्हणाली. सेरेनाचा शारापोव्हाविरुद्ध विजयी आकडा १८-२ असा आहे आणि गेल्या १७ सामन्यांत सेरेनाने तिच्यावर मिळवले आहेत. शारापोव्हाने दुखापत गंभीर नसून केवळ स्नायू ताणले असल्याचे सांगितले. ‘‘यातून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. यापेक्षा अधिक मी काहीही करू शकत नाही,’’ असे ती म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा