राफेल नदालपाठोपाठ मारिया शारापोव्हाला विम्बल्डन स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या सौंदर्यवती शारापोव्हाला पात्रता फेरीचा अडथळा पार करुन मुख्य फेरीत दाखल झालेल्या पोर्तुगालच्या मिचेल लार्चर डि ब्रिटोने चीतपट केले. जागतिक क्रमवारीत १३१व्या स्थानी असलेल्या ब्रिटोने तृतीय मानांकित शारापोव्हाला ६-३, ६-४ असे सरळ सेट्समध्ये नमवले. निसरडय़ा कोर्ट्सवर शारापोव्हा अनेकदा घसरली. दुसऱ्या सेटदरम्यान तिने दुखापतग्रस्त पायावर उपचारही करुन घेतले. मात्र या वारंवार घसरणीचा स्पष्ट परिणाम शारापोव्हाच्या खेळावर झाला आणि तिने सामना गमावला.
अन्य लढतींमध्ये अॅना इव्हानोव्हिक आणि ल्यूटन हेव्हिट या मानांकित खेळाडूंना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. विम्बल्डन पदार्पण साजरे करणाऱ्या कॅनडाच्या इग्युेनी बोऊचार्डने सर्बियाच्या १२व्या मानांकित अॅना इव्हानोव्हिकला पराभवाचा धक्का दिला. १९ वर्षीय बोऊचार्डने इव्हानोव्हिकचा ६-३, ६-३ असा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. जागतिक क्रमवारीत ६६व्या स्थानी असणाऱ्या बोऊचार्डचा पुढील फेरीत १९व्या मानांकित स्पेनच्या कार्ला सुरेझ नवारोशी मुकाबला होणार आहे.
पात्रता फेरीचा अडथळा पार करत मुख्य फेरीत दाखल झालेल्या जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनने माजी विम्बल्डन विजेत्या ल्युटन हेविटचे आव्हान संपुष्टात आले. वैविध्यपूर्ण फटके आणि सहजसुंदर शैलीच्या जोरावर ब्राऊनने हेविटला ६-४, ६-४, ६-७ (३-७), ६-२ असे नमवले. जागतिक क्रमवारीत ७०व्या स्थानी फेकल्या गेलेल्या हेविटने दोन वर्षांनंतर अविश्वसनीय पद्धतीने कोर्टवर पुनरागमन केले होते. दुखापतीच्या गंभीर स्वरूपामुळे हेविट टेनिस कोर्टवर परतू शकेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र सगळ्या अडथळ्यांना पार करत हेविटने पुनरागमन केले. मात्र ब्राऊनच्या आक्रमक खेळापुढे हेविट निष्प्रभ ठरला. पहिल्या फेरीत स्टॅनिलॉस वॉरविन्कासारख्या तगडय़ा प्रतिस्पध्र्याचे आव्हान मोडून काढत हेविटने चांगली सुरुवात केली होती, मात्र या पराभवामुळे त्याची विम्बल्डन वारी अल्पावधीतच संपुष्टात आली आहे.
माघारीचा दिवस
विम्बल्डन नगरीत बुधवारचा दिवस गाजला तो विविध खेळाडूंच्या माघारीने. जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्काने तसेच लाल मातीचा बादशाहला चीतपट करणाऱ्या स्टीव्ह डार्सिसने दुखापतीमुळे माघार घेतली. जॉन इस्नर आणि मारिन चिलीच यांनाही दुखापतीमुळे गाशा गुंडाळावा लागला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर माघारीमुळे कोर्टच्या निसरडय़ा स्वरुपाबाबत खेळाडूंनी शंका व्यक्त केली आहे.
द्वितीय मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काच्या गुडघ्याला सलामीच्या लढतीत दुखापत झाली होती. दुसऱ्या सेटच्या दुसऱ्या गेममध्ये सव्र्हिस करताना पाय घसरून अझारेन्का पडली. योग्य उपचारानंतर अझारेन्का कोर्टवर परतली आणि तिने शानदार विजय मिळवला होता. मात्र ही दुखापत गंभीर असल्याने अझारेन्काने दुसऱ्या फेरीच्या लढतीआधी माघार घेण्याचा निर्णय घेतला. अझारेन्काची इटलीच्या फ्लाव्हिआ पेनेन्टाशी लढत होणार होती. अझारेन्काने माघार घेतल्यामुळे पेनेन्टाला विजयी घोषित करण्यात आले. पुढच्या फेरीत पेनेन्टाचा मुकाबला फ्रान्सच्या अलिझ कॉर्नेटशी होणार आहे.
फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विक्रमी आठवे जेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालला सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का देणाऱ्या स्टीव्ह डार्सिसने खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली. जागतिक क्रमवारीत १३५व्या स्थानी असणाऱ्या डार्सिसने नदालला नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली होती. बुधवारी त्याची ल्युकाझ कुबोटशी लढत होणार होती. मात्र खांद्याच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने त्याने माघार घेतल्याचे संयोजकांनी सांगितले. दरम्यान नदालविरुद्धच्या लढतीत फटका खेळताना डार्सिस खांद्यावर पडल्याचे त्याच्या प्रशिक्षकाने सांगितले. कारकीर्दीतील अविस्मरणीय विजयानंतर डार्सिसला दुखापतीमुळे दुर्दैवी माघार घ्यावी लागली आहे.
अमेरिकेच्या १८व्या मानांकित जॉन इस्नरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली. अॅड्रियन मानारिओविरुद्धच्या सामन्यात दोन गेम खेळल्यानंतर इस्नरला गुडघ्यामध्ये त्रास जाणवू लागला. दुखापत गंभीर असल्याने त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला.