रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या त्रिकूटाची सद्दी मोडत मारिन चिलीच आणि केई निशिकोरी हे युवा योद्धे एकमेकांसमोर उभे ठाकले. पहिला आशियाई ग्रँडस्लॅम विजेता होण्याचे स्वप्न घेऊन खेळणाऱ्या निशिकोरीवर विजय मिळवत चिलीचने इतिहास घडवला. गोरान इव्हानसेव्हिकनंतर ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारा चिलीच क्रोएशियाचा केवळ दुसरा खेळाडू आहे.
१४व्या मानांकित २५ वर्षीय चिलीचने निशिकोरीवर ६-३, ६-३, ६-३ अशी सरळ सेट्समध्ये मात करत जेतेपद पटकावले. प्रतिबंधित उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याने गेल्या वर्षी चिलीचवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली. मात्र चिलीचने निर्दोष असल्याचे पुरावे सादर केले. यानुसार केवळ काही तांत्रिक गोष्टींमुळे या प्रकरणात चिलीच अडकल्याचे स्पष्ट झाले आणि त्याची शिक्षा नऊवरून चारवर करण्यात आली. शिक्षेच्या कालावधीमुळे गेल्या वर्षी चिलीचला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता आले नाही. या कटू आठवणी बाजूला सारत चिलीचने इव्हानसेव्हिकच्या मार्गदर्शनाखाली अथक मेहनत घेत जेतेपद साकारले.
२८वी ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळणारा चिलीच क्रमवारीत तुलनेने खूपच मागे असलेला विजेता ठरला आहे. २००२ मध्ये त्या वेळी जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असणाऱ्या पीट सॅम्प्रसने जेतेपद नावावर केले होते. रॉजर फेडररसारख्या दिग्गजाला नमवत चिलीचने अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीतही दिमाखदार खेळ करत त्याने जेतेपदापर्यंत आगेकूच केली.
रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांचा सहभाग नसलेली २००५ नंतरचा हा पहिलाच मुकाबला होता. २००५ मध्ये मरात साफिन आणि ल्युटन हेविट यांच्यात लढत झाली होती. चिलीचने अंतिम सामन्याचे कोणतेही दडपण न घेता खेळ करत सरशी साधली.
ढगाळ वातावरण आणि आल्हाददायक वातावरणात झालेल्या लढतीत चिलीचने पहिल्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत चिलीचने पहिला सेट जिंकला. निशिकोरीने खेळ सुधारत दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतली मात्र खोलवर सव्‍‌र्हिस करत तसेच शैलीदार फटक्यांच्या आधारे त्याने आगेकूच केली. ५-२ आघाडीतून चिलीचने निशिकोरीच्या चुकांचा फायदा उठवत दुसरा सेटही जिंकला.
अंतिम लढतीपर्यंत कोर्टवर तब्बल १६ तास व्यतित केलेल्या निशिकोरीला सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी तिसरा सेट जिंकणे क्रमप्राप्त होते. मात्र अतिबचावात्मक खेळाचा त्याला फटका बसला. चिलीचने या सेटमध्येही ३-१ अशी आघाडी घेतली.
तीन ब्रेकपॉइंट्सच्या आधारे त्याने ही आघाडी ५-२ अशी वाढवली. तीन मॅचपॉइंट्स कमावत चिलीचने जेतेपदाचे स्वप्न समीप आणले.
पहिला मॅचपॉइंट त्याने गमावला मात्र दुसऱ्याच्या वेळी बॅकहँड क्रॉसकोर्टच्या सुरेख फटक्याद्वारे त्याने सामन्यावर कब्जा केला.

Story img Loader