फ्रान्सच्या मारियन बाटरेलीने विम्बल्डन जेतेपदाची थाळी शनिवारी प्रथमच उंचावली, तेव्हा स्वप्नपूर्तीच्या आनंदाने ती भावूक झाली होती. २००७मध्ये बाटरेलीने विम्बल्डनच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु दुर्दैवाने तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर बाटरेली भावनिक झाली होती, तसेच २३ वर्षीय सबिन लिसिकीचे डोळेही अश्रूंनी डबडबले होते. बाटरेली आणि लिसिकी या दोघीही आपल्या कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी लढल्या. त्यामुळेच दिग्गज खेळाडू नसतानाही या अंतिम सामन्याला अनोखे महत्त्व प्राप्त झाले होते.
सहा वर्षांपूर्वी हुकलेल्या विम्बल्डन चषकाचे स्वप्न मारियनने अॅमेली मॉरेस्मोच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा पाहिले. शनिवारी बाटरेलीने सरळ सेट्समध्ये दणदणीत विजय मिळवून विम्बल्डनच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. बाटरेलीने अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सला नमवण्याची किमया साधणाऱ्या सबिन लिसिकीचा ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला.
अंतिम लढतीसाठी चोख आराखडय़ांसहित खेळणाऱ्या २८ वर्षीय बाटरेलीने पहिल्या सेटमध्ये ताकदवान सव्र्हिसवर भर दिला. बाटरेलीच्या झंझावातापुढे लिसिकी निष्प्रभ ठरली. लिसिकीच्या हातून मोठय़ा प्रमाणावर चुका झाल्या, याचा बाटरेलीने पुरेपूर फायदा उठवला. जमिनीलगतच्या फटक्यांचा प्रभावी उपयोग करत पहिला सेट ६-१ असा सहज जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सामन्यातील आव्हान जिवंत राखण्यासाठी लिसिकीने जबरदस्त खेळ केला. खोलवर सव्र्हिस आणि फोरहँडच्या फटक्यांद्वारे तिने बाटरेलीला झुंजवले. दोन्ही हातांनी फटके खेळणाऱ्या बाटरेलीने जेतेपदाच्या जिद्दीने लिसिकीच्या फटक्यांना प्रत्युत्तर देत ‘विजेतेपदाचे गुण’ कमावला. मात्र सेरेना विल्यम्स आणि अॅग्निेझेस्का रडवानस्का यांच्याविरुद्ध शानदार पुनरागमनासह विजय मिळवणाऱ्या लिसिकीने तीन विजेतेपदाचे गुण वाचवत सामन्यातील रंगत वाढवली. या सलग तीन गुणांसह लिसिकीने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र एका ताकदवान फोरहँडच्या फटक्याद्वारे बाटरेलीने सेटसह सामन्यावर कब्जा केला. २००६मध्ये अॅमेली मॉरेस्मोने फ्रान्सला विम्बल्डन किताब जिंकून दिला होता. त्यानंतर सात वर्षांनी विम्बल्डन जेतेपद फ्रान्सच्या बाटरेलीने जिंकण्याची किमया साधली. विशेष म्हणजे कारकीर्दीच्या कठीण कालखंडात मॉरेस्मोनेच बाटरेलीच्या पाठीशी राहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा