हाँगकाँगचा क्रिकेट संघ आहे पण तो प्रामुख्याने तिथे स्थायिक झालेल्या स्थलांतरितांचा आहे. पण हाँगकाँगकडून खेळलेला एक खेळाडू यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळतो आहे. न्यूझीलंडचा फिनिशर या भूमिकेत तो आहे. त्याचं नाव आहे-मार्क चॅपमन. मार्कची आई हाँगकाँगची तर वडील न्यूझीलंडचे. मार्कचं कुटुंब हाँगकाँगमध्ये होतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करता करता मार्कने क्रिकेट खेळण्याची आवड जोपासली. क्रिकेट उपकरणांची निर्मिती करणारी ईएससीयू ही कंपनी त्याने सुरू केली.
याच काळात न्यूझीलंडमध्ये खेळायची संधी मिळाली. वडील न्यूझीलंडचे असल्याने मार्कला न्यूझीलंडचा नागरिक होणं सोपं गेलं. हाँगकाँग हा आयसीसीच्या श्रेणीत असोसिएट देश आहे. या संघांच्या आपापसात लढती होतात. वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना पात्रता फेरी स्पर्धेत खेळावं लागतं. मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याची संधी अभावानेच मिळते. जेव्हाही मोठ्या स्पर्धेत खेळायची संधी मिळते तेव्हा अनुभव कमी असल्यामुळे त्यांना प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागतो. या संघांमधले अनेक खेळाडू नोकरी-व्यवसाय सांभाळून खेळत असतात. क्रिकेट हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत नसतो. बोर्डाची आर्थिक ताकदही मर्यादित असल्याने फक्त क्रिकेटपटू राहून उदरनिर्वाह चालत नाही. चांगल्या दर्जाचं क्रिकेट नियमितपणे खेळता यावं यासाठी चॅपमनने न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा: मार्नस लबूशेन, बदली खेळाडूचा बघता बघता मुख्य खेळाडू झाला
न्यूझीलंडला जाण्यापूर्वी मार्क हाँगकाँगकडून खेळत होता. हाँगकाँगचा संघ २०१४ मध्ये बांगलादेशात झालेल्या तर २०१६ मध्ये भारतात झालेल्या ट्वेन्टी२० विश्वचषकात खेळला होता. मार्क त्या संघाचा भाग होता. हाँगकाँगसाठी वनडे पदार्पणात मार्कने युएई संघाविरुद्ध दुबई येथे शतकी खेळी साकारली होती. मार्कने ११ चौकार आणि २ षटकारांसह १२४ धावांची मॅरेथॉन खेळी केली होती.
न्यूझीलंडमधील डोमेस्टिक संघ ऑकलंड, न्यूझीलंड अ संघाकडून तो नियमितपणे खेळू लागला. डावखुरा फलंदाज असणारा मार्क कमी चेंडूत मोठ्या खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑकलंडसाठी खेळताना त्याची कामगिरी उत्तम असल्यामुळे न्यूझीलंडच्या निवडसमितीने त्याला पदार्पणाची संधी दिली. कोरोना संकट उद्भवण्याच्या सुमारास न्यूझीलंडचा संघ स्कॉटलंडच्या दौऱ्यावर होता. स्कॉटलंडने न्यूझीलंडच्या चांगल्या आक्रमणासमोर ३०६ धावांची मजल मारली. हे आव्हान कठीण होतं. पण मार्कच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. मार्कने ६ चौकार आणि ७ षटकारांसह ७५ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली.
दमदार फटकेबाजी करत असल्यामुळे ट्वेन्टी२० लीगमध्ये मार्क खेळताना दिसतो. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील सेंट ल्युसिया स्टार्स आणि ग्लोबल ट्वेन्टी२० कॅनडा स्पर्धेत ब्रॅम्प्टन वोल्व्ह्स संघासाठी खेळतो.
चेन्नईतल्या संथ खेळपट्टीवर न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. या विजयात मार्कने १२ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २५ धावांची वेगवान उपयुक्त खेळी केली. आधीच्या सामन्यांमध्ये चॅपमनला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. अफगाणिस्तानकडे फिरकीपटूंचं त्रिकुट आहे. त्यांचा सामना करणं सोपं नाही. पण चॅपमनने छोट्या संधीचं सोनं करत फटकेबाजी केली. न्यूझीलंडच्या संघाकडे नेहमीच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असतो. चॅपमन याच जातकुळीतला. न्यूझीलंडने त्याच्यावर फिनिशरची जबाबदारी सोपवली आहे. हाणामारीच्या षटकात येऊन चांगली धावसंख्या उभारून देणे किंवा धावांचा पाठलाग करताना सलामीच्या तसंच मधल्या फळीच्या फलंदाजांनी उभारलेल्या पायावर कळस चढवणे हे काम चॅपमनकडे देण्यात आलं आहे. जोखमीचं काम आहे पण २९वर्षीय चॅपमन या जबाबदारीला न्याय देईल असा विश्वास न्यूझीलंडच्या संघव्यवस्थापनाला आहे.