Mark Wood praised by Ben Stokes after winning the third Test: हेडिंग्ले कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून पराभव करत इंग्लंड संघाने २०२३ च्या ॲशेस मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर इंग्लिश संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. या सामन्यात मार्क वुडकडून गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत संघासाठी सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. संघाच्या विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेही मार्क वुडचे कौतुक करत, तो खास खेळाडू असल्याचे सांगितले.
बेन स्टोक्सने हेडिंग्ले कसोटी जिंकल्यानंतर सांगितले की, ”विजयानंतर खूप आनंद झाला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजी काहीही करू शकलो असतो. मिचेल मार्शने पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत सामना आमच्यापासून हिरावून घेतला. या मैदानाचे आऊटफिल्ड खूप चांगले आहे. मार्क वुड आणि ख्रिस वोक्स या दोघांनीही पुनरागमन करताना उत्कृष्ट कामगिरी केली. वोक्सचा खेळ पाहून मला अजिबात वाटले नाही की तो बऱ्याच दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळत आहे.”
स्टोक्सने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले की, “मार्क वुडसारखा खेळाडू संघात असल्याने तुम्हाला खूप ताकद मिळते. ताशी ९५ मैल वेगाने गोलंदाजी करण्यासोबतच तो संघासाठी खालच्या क्रमवारीत फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान देतो. केवळ ८ चेंडूत २४ धावा करणे सोपे नाही. प्रत्येक वेळी असे करण्यात तुम्ही यशस्वी होत नाही.”
हेही वाचा – ENG vs AUS 3rd Test: हॅरी ब्रूकने इंग्लंडसाठी रचला इतिहास! ‘हा’ कारनामा करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू
दोन्ही संघांसाठी पुढचा सामना खूप महत्त्वाचा असेल –
ॲशेस २०२३ मालिकेतील पुढील कसोटी सामना आता १९ जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जाईल. याबाबत बेन स्टोक्स म्हणाला की, “आता चौथा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. प्रत्येकाला चांगला खेळ पाहायचा आहे. ९ दिवसांचा ब्रेक मिळाल्याने आम्हाला विश्रांतीची संधीही मिळेल. हेडिंग्ले येथे येऊन आमच्यासाठी खेळणे नेहमीच छान असते, आम्हाला येथील चाहत्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळतो.”