जाबेऊरचे सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान
विम्बल्डन : चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोन्ड्रोउसोवाने इतिहास रचताना प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेची पहिली बिगरमानांकित विजेती होण्याचा मान मिळवला. वोन्ड्रोउसोवाने शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरवर विजय मिळवला. त्यामुळे जाबेऊरला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत ४२व्या स्थानी असलेल्या २४ वर्षीय वोन्ड्रोउसोवाने धक्कादायक निकाल नोंदवताना जाबेऊरवर ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये सरशी साधली.
ऑल इंग्लंड क्लबच्या या स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी डावखुरी वोन्ड्रोउसोवा गेल्या ६० वर्षांतील पहिली महिला टेनिसपटू होती. त्यामुळे अंतिम लढतीत जाबेऊरचे पारडे जड मानले जात होते . जाबेऊरने गतवर्षीही विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. यंदा पुन्हा अंतिम फेरी गाठण्यापूर्वी जाबेऊरने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या एलिना रायबाकिनाचा, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची विजेती आणि दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काचा पराभव केला होता. त्यामुळे जाबेऊर कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवेल अशी बहुतांश टेनिसरसिकांना अपेक्षा होती. मात्र, वोन्ड्रोउसोवाविरुद्ध तिला आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. वोन्ड्रोउसोवाने दोन्ही सेटमध्ये पिछाडीनंतर पुनरागमन केले. पहिल्या सेटमध्ये २-४ अशी पिछाडीवर असताना वोन्ड्रोउसोवाने सलग चार गेम जिंकले. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने अखेरचे सलग तीन गेम जिंकत सेट आणि सामना जिंकला. वोन्ड्रोउसोवाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी २०१९ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेत ती उपविजेती होती. वोन्ड्रोउसोवा गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत दुखापतीमुळे टेनिस कोर्टच्या बाहेर होती. त्यामुळे वर्षांअखेरीस ती क्रमवारीत ९९व्या स्थानी गेली होती. मात्र, २०२३ वर्षांत तिने अप्रतिम कामगिरी केली आहे.