Marnus Labuschagne reacts to Virat Kohli’s sledging : ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात ट्रॅव्हिस हेडसोबत मॅच-विनिंग भागीदारी करणाऱ्या मार्नस लाबुशेनने या मोठ्या सामन्याबद्दल एक लेख लिहिला आहे. या लेखात त्याने विराट कोहली जेव्हा त्याला भडकवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हाच्या विशेष प्रकरणाचाही उल्लेख केला आहे. विराट कोहलीकडून वारंवार होणाऱ्या स्लेजिंगला त्याने कसा प्रतिसाद दिला, हे देखील लाबुशेनने या प्रकरणात सांगितले आहे.
‘माय वर्ल्ड कप फायनल रॅप’ या शीर्षकाच्या आपल्या न्यूजलेटरमध्ये मार्नस लाबुशेनने लिहिले आहे की, “तिथे खूप गोंगाट सुरु होता आणि त्यावेळी टीम इंडियाने खूप वेगाने गती वाढवली होती. भारतीय संघ माझ्या दिशेने येत होता. खरे सांगायचे तर मी उत्तरात एवढेच म्हणू शकलो की, तुम्ही जे काही बोलत आहात, मला या गोंगाटात काहीही ऐकू येत नाही.”
मार्नस लाबुशेनने पुढे लिहले की, “जेव्हा बस स्टेडियमवर पोहोचत होती, तेव्हा आम्ही पाहिले की सुमारे ५ किमी अंतरावरून चाहते रांगेत उभे आहेत. या सामन्यासाठी तेथील चाहते किती उत्साही होते, हे पाहणे आश्चर्यकारक होते. गर्दी निळ्याशार समुद्रासारखी होती. जणू काही ही आमच्यात आणि बाकीच्या जगाची स्पर्धा आहे. आम्हालाही असे वातावरण आवडते.”
विराट कोहलीचे मार्नस लाबुशेनला स्लेजिंग –
विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघ २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, एक वेळ अशी आली होती की कांगारू संघाने ४७ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी मार्नस लाबुशेन खेळपट्टीवर ट्रेव्हिड हेडसोबत उभा होता. यावेळी विराट कोहली मार्नस लाबुशेनला सतत स्लेजिंग करत होता. जेव्हा कोहली स्लेजिंग करत होता, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये भारतीय क्रिकेट चाहते जल्लोष करत होते. मात्र, या स्लेजिंगला प्रत्युत्तर देण्याऐवजी लाबुशेनने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि हुशारीने फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने ट्रॅव्हिस हेडच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १९१ धावांची भागीदारी करत कांगारू संघाला सहज विजय मिळवून दिला.