भारतीय संघाचे ‘मिशन वर्ल्डकप’ सुरू झाले आहे. पाच जून रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे. लग्नानंतर माझ्या नेतृत्वात सुधारणा झाल्याचे वक्तव्य भारतीय कर्णधार विराट कोहलीनं केले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये झाले होते.

वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी ICCच्या एका कार्यक्रमात विराट कोहली बोलत होता. त्यावेळी त्यानं आपल्या नेतृत्वात होत असलेल्या सुधारण्याचे श्रेय पत्नी अनुष्का शर्माला दिलं आहे. लग्नानंतर माझ्या खेळांमध्येच नाही तर नेतृत्वातही खूप सुधारणा झाली आहे, असे विराट म्हणाला. ‘लग्नानंतर आपण आधिक जबाबदार होतो आणि जिम्मेदारी घेऊन वागायला लागतो. लग्नानंतर आपल्याला अनेक गोष्टी समजायला सुरूवात होते. आपण प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करायला लागतो, असे विराट कोहलीनं सांगितले. ‘

मुलाखतीमध्ये विराट म्हणाला की, ‘ पहिल्यापेक्षा आधिक जबाबदार झालो आहे. माझ्या नेतृत्वातही अमुलाग्र बदल धाला आहे. खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणूनही माझ्यात चांगला बदल झाला आहे.’

विराट कोहलीसमोर भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्याचे आव्हान आहे. यावर मुलाखतीत त्याला काही मजेदार प्रश्न विचारण्यात आले. जुन्या ऑस्ट्रेलिया संघातील कोणत्या एका खेळाडूची निवड करशील? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. त्यावर त्याने क्षणांचाही विचार न करता महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे नाव घेतले.

भारताने आतापर्यंत १९८३ आणि २०११ असे दोन विश्वचषक जिंकले आहेत. त्यापैकी २०११ च्या विश्वचषकाचा विराट कोहली भाग होता. तर २०१५ मध्ये तो संघाचा उपकर्णधार होता. विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार म्हणून या विश्वचषकात उतरत आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक क्रीडा प्रेमींची नजर विराट कोहलीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीनं भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले आहे.