३० चेंडूंत ९३ धावांची वादळी खेळी; न्यूझीलंडचा ८.२ षटकांत श्रीलंकेवर विजय

हेगले ओव्हल मैदानावर सोमवारी मार्टिन गप्तिलने ३० धावांत नाबाद ९३ धावांची वादळी खेळी करून न्यूझीलंडला श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवून दिला.  ५० षटकांच्या सामन्यात श्रीलंकेच्या ११८ धावांचे माफक लक्ष्य न्यूझीलंडने अवघ्या ८.२ षटकांत पूर्ण करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेकडून या लढतीत समाधानकारक खेळाची अपेक्षा होती, परंतु त्यांनी जुनाच कित्ता गिरवला. मॅट हेन्री (४-३३) आणि मिचेल मॅक्लेघन (३-३२) यांच्या टिच्चून माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव २७.४ षटकांत अवघ्या ११७ धावांत गडगडला. संघाकडून नुवान कुलसेकराने सर्वाधिक १९ धावांची खेळी केली. हे माफक लक्ष्य झटपट पूर्ण करून विजयोत्सव साजरा करण्याच्या निश्चयाने मदानावर उतरलेल्या गप्तिल आणि टॉम लॅथम यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर प्रहार केला.

दुशंत चमीराचा डावातील पहिलाच चेंडू गप्तिलने ‘लेग गली’ला टोलवला, मिलिंदा सिरीवर्दना तो चेंडू झेलण्यासाठी पुढे सरसावला, परंतु त्याच्या हातून झेल सुटला आणि त्याने सीमारेषा गाठली. पहिल्याच चेंडूवर मिळालेले जीवदान आणि चौकारामुळे गप्तिलने आक्रमणाची धार अधिक तीव्र करत श्रीलंकेचे धाबे दणाणून सोडले. तिसऱ्या चेंडूवर टॉम लॅथमने चौकार मारून गप्तीलला योग्य प्रतिसाद दिला. त्यानंतर गप्तिलला रोखणे श्रीलंकेच्या गोलंदाजांना कठीण झाले.

चमीराच्या दुसऱ्या षटकात गप्तिलने सलग तीन षटकार व दोन चौकार लगावून २७ धावा कुटल्या. अवघ्या १७ चेंडूंत गप्तिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. एकदिवसीय सामन्यातील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. ट्वेंटी-२० पद्धतीने गप्तिलने फलंदाजी करताना ९ चौकार व ८ षटकार खेचून नाबाद ९३ धावा चोपल्या. लॅथमने २० चेंडूंत नाबाद १७ धावा करून त्याला योग्य साथ दिली. बघता बघता न्यूझीलंडने ८.२ षटकांत बिनबाद ११८ धावा करून विजय निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : २७.४ षटकांत सर्व बाद ११७ (दनुष्का गुणथिलका १७, नुवान कुलसेकरा १९; मॅट हेन्री ४/३३, मिचेल मॅक्लेघन ३/३२) पराभूत वि. न्यूझीलंड : ८.२ षटकांत बिनबाद ११८ (मार्टिन गप्तिल नाबाद ९३, टॉम लॅथम नाबाद १७).

सामनावीर : मार्टिन गप्तिल.

३ : २५० किंवा त्यापेक्षा जास्त चेंडू राखून विजय मिळवण्याची न्यूझीलंडची तिसरी वेळ. या तिन्ही लढती दहा विकेट्सनी जिंकण्याचा पराक्रम  न्यूझीलंडच्या नावावर.

१७ : अर्धशतकासाठी मार्टिन गप्तिलने घेतलेले चेंडू. एकदिवसीय इतिहासातली दुसरे वेगवान अर्धशतक. न्यूझीलंडसाठी एकदिवसीय प्रकारातले हे वेगवान अर्धशतक. याआधी ब्रेंडन मॅक्क्युलमने विश्वचषक २०१५ स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.

३१० : मार्टिन गप्तिलच्या ३० चेंडूत ९३ धावांच्या खेळीचा स्ट्राइकरेट. एकदिवसीय प्रकारात ५० पेक्षा अधिक धावा करतानाचा हा दुसरा सर्वोत्तम स्ट्राइकरेट.

Story img Loader