आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी होणारी भारतीय बॉक्सिंग संघ निवड चाचणी ऐनवेळी पुढे ढकलल्यामुळे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोम हिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
देशातील बॉक्सिंगची सूत्रे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने नियुक्त केलेल्या अस्थायी समितीकडे आहेत. या समितीतर्फे शनिवारी आशियाई स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंनी केलेल्या विनंतीमुळे ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय अस्थायी समितीने घेतला आहे. मात्र हा निर्णय संबंधित खेळाडूंपर्यंत पोहोचलेला नाही.
मेरी कोम पतियाळा येथे सध्या प्रशिक्षण घेत आहे. निवड चाचणीबाबत तिने सांगितले की, ‘‘मणिपूर येथे माझ्या तीन मुलांना घरी ठेवून मी अनेक दिवस या चाचणीसाठी येथे सराव करीत आहे. मात्र अद्याप संयोजकांनी मला या संदर्भात काहीही कळविलेले नाही. प्रसारमाध्यमांकडून मला ही माहिती मिळाली. आम्हाला ही माहिती का कळविलेली नाही, हे मला समजलेले नाही. राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंबाबत मला अतिशय आदर आहे. त्यांना थोडी विश्रांती मिळण्याची आवश्यकता होतीच, मात्र संयोजकांनी चाचणी पुढे ढकलल्याची माहिती सर्व संबंधितांना वेळेवर देण्याची गरज होती. त्याचेच मला दु:ख वाटत आहे.’’
निवड चाचणीत सहभागी होणारे बरेचसे खेळाडू येथून पतियाळा येथे होणाऱ्या चाचणीसाठी बसमध्ये बसण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांना चाचणी पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त कळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा