बॉक्सिंग अकादमीच्या विस्तारीकरणासाठी वाढीव जागेची बॉक्सिंगपटू मेरी कोमची मागणी पूर्ण होणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकविजेत्या मेरी कोमला मणिपूर सरकारने अकादमीच्या विस्तारासाठी भूखंड देण्याचे निश्चित केले आहे.
अकादमीसाठी ३.३० एकर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मणिपूर राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री इबोबी सिंग यांचे मनापासून आभारी असल्याचे मेरी कोम विभागीय बॉक्सिंग फाऊंडेशनने आपल्या पत्रकात म्हटले आहे. लांगोल या ठिकाणी ही अकादमी असणार आहे.
घर-संसार सांभाळत मेरीने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर कब्जा केला. या ऐतिहासिक यशानंतर ऑगस्ट २०१२ मध्ये मेरीला ही जागा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्यास मार्च २०१३ उजाडले.
मर्यादित साधनांसह २००६ मध्ये मेरीने या बॉक्सिंग अकादमीची मुहूर्तमेढ रोवली. आर्थिकदृष्टय़ा मागास बॉक्सिंगपटूंना मार्गदर्शन पुरवणे हे या अकादमीचे उद्दिष्ट आहे. यामुळे येथे शिकणाऱ्या बॉक्सिंगपटूंना मोफत प्रशिक्षण आणि निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या या अकादमीत ५७ बॉक्सिंगपटू प्रशिक्षण घेत आहेत.
पुढील ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर माझे भव्य अकादमीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांची मनापासून आभारी असल्याचे मेरीने सांगितले. जागेच्या उपलब्धेतमुळे उदयोन्मुख बॉक्सिंगपटूंना मोठी प्रेरणा मिळणार असून, देशासाठी आणखी सन्मान मिळवण्यासाठी ते प्रेरित होतील, असा विश्वासही मेरीने व्यक्त केला.
वाढीव जागेमुळे अनेक समस्या मार्गी लागणार आहेत. यापैकी मुख्य म्हणजे पावसाच्या हंगामात सरावाची अडचण उद्भवत असे, पण आता हा प्रश्न सुटेल, असे तिने पुढे सांगितले. सरकारच्या या सहकार्यामुळे आम्ही आणखी चांगली कामगिरी करू, असे ती पुढे म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा