आशियाई सुवर्णपदक विजेती एम. सी. मेरी कोम हिने आपल्या अकादमीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आहे. मणिपूरमध्ये एप्रिल महिन्यात हा समारंभ होणार आहे. मेरी कोम हिने बुधवारी नवी दिल्लीत मोदी यांची भेट घेतली व त्यांना या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. मेरी हिने सांगितले, ‘‘मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीमुळे मी खूप भारावून गेले आहे. माझ्या अकादमीचे काम एप्रिलच्या सुरुवातीस पूर्ण होत असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या वेळेनुसार हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यांनी या समारंभासाठी येण्याचे मान्य केले आहे. तसेच केव्हाही खेळाच्या विकासाबाबत काही समस्या असल्यास नि:संकोचपणे संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितल्यामुळे दडपण दूर झाले आहे.’’