नुकत्याच इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून मेरी कोमची निवड करण्यात आली. स्पर्धेदरम्यान भारतीय पथकाचे प्रायोजक असणाऱ्या सॅमसंग इंडियाद्वारे पदकविजेत्यांना गौरवण्यात आले. त्या वेळी मेरी कोमला या उपाधीने सन्मानित करण्यात आले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी मेरी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली होती.
स्पर्धेतील मौल्यवान खेळाडूसाठी सर्वेक्षण घेण्यात आले. पुरुष आणि महिलांमध्ये सुवर्णपदक पटकावणारे कबड्डी संघ, २८ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवत ऐतिहासिक पदक पटकावणारा हॉकीचा संघ यांच्यासह अकरा पदक विजेते या उपाधीसाठी रिंगणात होते. तीन मुलांची आई असलेल्या मेरीने १८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पदकासह पुनरागमन केले. या दिमाखदार कामगिरीसाठी मेरीला ही उपाधी बहाल करण्यात आली.
सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक विजेता जितू राय, थाळीफेकपटू सीमा पूनिया-अंतील, ४ बाय ४०० रिलेपटू एम. आर. पुवम्मा या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.
‘‘मातृत्वानंतर महिला क्रीडापटूंना यशोशिखर गाठता येत नाही, हा समज खोडून काढायचा होता. आशियाई स्पर्धेत मी खेळू शकेन का, याविषयीही साशंकता होती. १८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर मी पुनरागमन करत होते. तीन मुलांची आई झाल्यानंतर बॉक्सिंगसारख्या खेळाची आवड जोपासणे आपल्या समाजात कठीण आहे. पदकाने मी सगळे गैरसमज दूर केले आहेत,’’ असे मेरी म्हणाली.
योगेश्वर दत्त म्हणाला, ‘‘२८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. एकमेव सुवर्णपदक पुरेसे नाही. भारतातर्फे बहुतांशी खेळाडूंनी सुवर्णपदकावर कब्जा करायला हवा. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा माझा प्रयत्न आहे. ६५ किलो वजनी गट मी निश्चित केला आहे. याच गटातून खेळताना मी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

Story img Loader