सततच्या दुखापतींमुळे चार वर्षांपूर्वी कारकीर्द संपुष्टात आल्याची चर्चा असलेला भारताचा अव्वल बॉक्सर अखिल कुमार याने इंच्योन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या १० जणांच्या पुरुष संघात स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघात स्थान न मिळवू शकलेली ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिनेही आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक पटकावणारी एल. सरिता देवी हिने ६० किलो वजनी गटात अपेक्षेप्रमाणे स्थान मिळवले आहे.
आशियाई स्पर्धेसाठी बॉक्सिंग संघ
पुरुष : एल. देवेंद्र सिंग (४९ किलो), मदन लाल (५२ किलो), शिवा थापा (५६ किलो), अखिल कुमार (६० किलो), मनोज कुमार (६४ किलो), मनदीप जांगरा (६९ किलो), विकास कृष्णन (७५ किलो), कुलदीप सिंग (८१ किलो), अमरित सिंग (९१ किलो), सतीश कुमार (९१ किलोवरील). महिला : एम. सी. मेरी कोम (५१ किलो), एल. सरिता देवी (६० किलो), पूजा राणी (७५ किलो).
बॉक्सिंगपटूंची प्रवेशिका वैयक्तिक राहण्याची शक्यता
भारतीय बॉक्सिंग महासंघाची निवडणूक आशियाई स्पर्धेपूर्वी झाली नाही तर भारतीय खेळाडू देशाच्या वतीने न खेळता वैयक्तिक प्रवेशिकेद्वारे सहभागी होण्याची शक्यता आहे, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक जिजी थॉमसन यांनी सांगितले. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी देशाच्याच प्रवेशिकेद्वारे भाग घेतला होता. ही स्पर्धा झाल्यानंतर लगेचच भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुका होतील, अशी शक्यता होती. ११ सप्टेंबर रोजी या निवडणुका होणार आहेत, मात्र त्या दिवशी निवडणूक झाली नाही तर खेळाडूंना वैयक्तिक प्रवेशिकेद्वारे किंवा आशियाई बॉक्सिंग महासंघाच्या नावाखाली भाग घ्यावा लागेल.

Story img Loader