पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सरिता देवीचे सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न हुकल्यानंतर पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिने अंतिम फेरीत धडक मारत भारताला सुवर्णपदकाच्या आशा दाखवल्या आहेत. सरिता देवी आणि पूजा राणी यांना उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विकास कृष्णन आणि सतीश कुमार यांनी उपांत्य फेरीत धडक मारत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
३१ वर्षीय मेरी कोमने व्हिएतनामच्या ले थी बँग हिचा ३-० असा सहज पाडाव करत अंतिम फेरी गाठली. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या मेरी कोमच्या पंचेसचा वेग भन्नाट होता. त्यामुळे मेरी कोमचे आक्रमण थोपवणे बँग हिला जमले नाही. मेरी कोमने पंचेसची सरबत्ती करत बँग हिला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. चौथ्या आणि अंतिम फेरीत बँगने मेरी कोमला पंचेस लगावले. पण तोपर्यंत मेरी कोमने लढतीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. बल्गेरियाच्या पहिल्या प्रशिक्षकांनी मेरी कोमला ४०-३६ असे गुण दिले. मोरोक्कोच्या दुसऱ्या पंचांनी ४०-३६ असे गुण दिले. इटलीच्या तिसऱ्या पंचांनी चौथ्या फेरीत बँग हिच्या बाजूने १०-९ असा कौल दिला. पण मेरीने ३९-३७ अशा गुणांसह बाजी मारली.
पूजा हिने कियानविरुद्ध कडवी लढत दिली, पण तिला १-२ असे पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांमध्ये, एल. देवेंद्र सिंग आणि शिवा थापा यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे पदकाविनाच मायदेशी परतावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवा थापाला (५६ किलो) फिलिपिन्सच्या मारियो फर्नाडेझकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर देवेंद्र सिंगचे (४९ किलो) आव्हानही दक्षिण कोरियाच्या शिन जोंगहमने ०-३ असे संपुष्टात आणले. सतीश कुमारने ९१ किलोवरील वजनी गटात सुरेख कामगिरी करत जॉर्डनच्या ईशायश हुसेन याचा २-१ असा पराभव केला. त्याला २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या इव्हान डायचको याचा सामना करावा लागेल. गतविजेत्या विकासने ७५ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या हर्शीदबेन नोर्माटोव्ह याचा ३-० असा सहज पराभव केला. त्याला उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या ए. झानिबेक याच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.

Story img Loader