जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणारी एम. सी. मेरी कोम आणि आशियाई क्रीडा स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या सरिता देवी यांचे रिओ ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले आहे. अस्ताना सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील दुसऱ्याच फेरीत दोघींना पराभवाला सामोरे जावे लागले.
मेरी कोमने २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. जागतिक स्पर्धेत तिला ५१ किलो गटाच्या लढतीत जर्मनीच्या अझिझी निमानीने २-० असे हरवले. तर ६० किलो वजनी गटात व्हिक्टोरिया टोरेसने सरिता देवीला ३-० असे पराभूत केले. ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्यासाठी मेरी कोम आणि सरिताला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची आवश्यकता होती.
उत्कंठापूर्ण लढतीत मेरीने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता, मात्र निमानीने चांगल्या रीतीने बचाव करीत तिचे हे प्रयत्न हाणून पाडले. लढतीमधील दुसऱ्या टप्प्यात मेरीने जोरदार ठोसे मारले, मात्र पंचांनी निमानीच्या बाजूने निर्णय दिले. हळूहळू आत्मविश्वास वाढल्यानंतर निमानीने आक्रमक चाली करीत मेरी कोमचा बचाव निष्प्रभ ठरवला. मेरीच्या तुलनेत निमानीने मारलेल्या ठोशांमध्ये अचूकता होती. साहजिकच
पंचांनी जर्मन खेळाडूच्या बाजूने निकाल दिला.

विजय आणि पराजय हे खेळाचेच भाग असतात. मी अथक परिश्रमांनिशी सर्वोत्तम प्रयत्न केले होते. पराभवाच्या निर्णयामुळे मला अतिशय दु:ख झाले, परंतु ते माझ्या हातात नव्हते. खिलाडूवृत्तीने मी पंचांच्या निर्णयाचा आदर करीत आहे.
– मेरी कोम

Story img Loader