इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर आता भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिचे २०१६मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकडे लक्ष लागले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर ती रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुढील वर्षी बॉक्सिंग रिंगमध्ये अवतरणार आहे.
‘‘रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे, हे माझे प्रमुख ध्येय आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर मी पुढील वर्षी ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धामध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहे. आशियाई स्पर्धेआधी मी १८ महिन्यांच्या कालावधीनंतर पुनरागमन केले होते. लंडन ऑलिम्पिकनंतर मी तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यामुळे वर्षभर कोर्टबाहेर होते. सध्या मी सरावात कठोर मेहनत घेत होते. पण पाठीची दुखापत पुन्हा उफाळून आली. त्याचबरोबर मांडीचे स्नायू ताणले गेले आहेत. या दुखापतींवर योग्य उपचार केल्यानंतर मी कोर्टवर परतणार आहे. पुढील वर्षांच्या सुरुवातीला मी पुनरागमन करणार असून महत्त्वाच्या सर्वच स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे,’’ असे लंडन ऑलिम्पिकमध्ये
कांस्यपदक पटकावणाऱ्या मेरी कोमने सांगितले.
बॉक्सिंगमधून निवृत्ती करण्याबाबत मेरी म्हणते, ‘‘रिओ ऑलिम्पिकनंतर बॉक्सिंग सुरू ठेवणे कठीण जाणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिक ही माझी अखेरची स्पर्धा असणार आहे.’’ सरितावरील बंदी लवकरात लवकर उठवण्यात यावी, असे आवाहन मेरीने यावेळी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा