व्हिर्गिनिया फुच्सकडून पराभव
पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकावणाऱ्या भारताच्या एम. सी. मेरी कोमला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या ऑलिम्पिक चाचणी स्पध्रेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक पूर्वतयारी म्हणून रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या या स्पध्रेत मेरीला उपांत्य फेरीत अमेरिकेच्या व्हिर्गिनिया फुच्सकडून पराभव पत्करावा लागला.
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदकविजेत्या मेरीने वर्षभराच्या विश्रातीनंतर सहभाग घेतलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. गतवर्षी इन्चॉन येथे झालेल्या आशियाई स्पध्रेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे मेरीने विश्रांतीचा निर्णय घेतला होता. पुरुष गटातही भारताच्या चारही खेळाडूंना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने भारताचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले.
राष्ट्रकुल स्पध्रेतील माजी सुवर्णपदक विजेत्या मनोज कुमारला ६४ किलो वजनी गटात इंग्लंडच्या सॅम्युअल मॅक्सवेलने, तर विश्व अजिंक्यपदक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या सतीश कुमारला (+९१ किलो) इंग्लंडच्याच फ्रेझर क्लार्कने पराभूत केले. तसेच प्रवीण कुमार (९१ किलो) आणि श्याम काकरा (५१ किलो) यांना अनुक्रमे स्थानिक खेळाडू गिडेल्सन डी ऑलिव्हेरा आणि उजबेकिस्तानच्या हसनबय दुस्मातोव्हने नमवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा