इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या घरी मास्कधारी टोळीने घुसून चोरी केल्याचं स्पष्ट झालं आहे. चोरांनी शिरकाव केला तेव्हा त्याची पत्नी आणि दोन मुलं घरातच होते. स्टोक्स त्यावेळी पाकिस्तानात होता. इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असल्याने स्टोक्स तिकडे होता.

चोरांनी कुटुंबीयांनी कोणताही त्रास दिला नसल्याचं स्टोक्सने सांगितलं पण काही महत्त्वाच्या वस्तू चोरांनी लंपास केल्याचं त्याने सांगितलं.

चोरांनी लंपास केलेल्या वस्तूंसंदर्भात स्टोक्सने सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली. २०२० मध्ये स्टोक्सला प्रतिष्ठेच्या OBE पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तो पुरस्कार चोरट्यांनी लांबवला आहे.

‘माझी बायको आणि मुलं घरात असताना ही चोरी झाली हे खूपच वाईट होतं असं स्टोक्सने म्हटलं आहे. सुदैवाने त्यांना काही झालं नाही हे आमचं नशीब’, असं त्याने सांगितलं. ‘या प्रसंगामुळे बायको आणि मुलं हादरुन गेले आहेत. परिस्थिती आणखी बिकट होऊ शकली असती’, असं तो म्हणाला.

स्टोक्स डरहॅम काऊंटीमध्ये कॅस्टल इडन इथे राहतो. १७ ऑक्टोबर रोजी ही चोरी झाल्याचं त्याने सांगितलं. पुढच्याच दिवशी पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला. स्टोक्स ३७ धावांवर बाद झाला.

तिसरी कसोटी झाल्यानंतर स्टोक्स मायदेशी परतला. ‘ज्या वस्तू गहाळ झाल्या त्यांचे फोटो मी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या सहजी ओळखता येतील. चोरांना लवकरात लवकर पकडलं जाईल अशी आशा आहे’, असं स्टोक्सने म्हटलं आहे.

‘या वस्तू आमच्यासाठी अमूल्य अशा होत्या. पण फोटो शेअर करण्याचं प्रमुख कारण म्हणजे चोर पकडले जाऊन त्यांना शिक्षा व्हावी. दागिने, पुरस्कार आणि अन्य काही महत्त्वाच्या वस्तू चोरांनी लंपास केल्या आहेत. माझ्या कुटुंबीयांसाठी त्या केवळ वस्तू नव्हत्या, आमच्यासाठी भावनिकदृष्ट्या त्या वस्तूंचं महत्त्व अपार असं आहे. त्यांची भरपाई होऊ शकत नाही’, असं स्टोक्सने लिहिलं आहे.

ज्या कोणाला या चोरांविषयी काही माहिती मिळाल्यास तातडीने यंत्रणांना द्यावी असं आवाहन स्टोक्सने केलं आहे. पुरस्काराव्यतिरिक्त स्टोक्सने तीन गळ्यातले, रिंग आणि डिझायनर बॅगचा फोटो शेअर केला आहे.

काही वर्षांपूर्वी इंग्लंडचे फुटबॉलपटू विदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या घरात अशा स्वरुपाच्या चोऱ्या झाल्या होत्या.