भारतीय क्रिकेट गेल्या काही दिवसांपासून कर्णधारपदाच्या वादामुळे चर्चेच असताना संघ दक्षिण अफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून यावेळी या वादाचा संघावर काही परिणाम होतो का हे पहावं लागणार आहे. दरम्यान कसोटी संघाचं नेतृत्व मिळालेला रोहित शर्मा दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. तर दुसरीकडे विराट कोहली तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघासोबत दाखल झाला आहे. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल मोठं विधान केलं आहे.
Explained: विराट, रोहित, बीसीसीआय नी कर्णधारपद; काय आहे नेमका वाद?
सचिन तेंडुलकरने बोरिया मजुमदार यांना त्याचा युट्यूब कार्यक्रम ‘Backstage with Boria’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माच्या नेतृत्वावर भाष्य केलं. “रोहित स्वत: एक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे कौशल्य असून त्याच्याकडे असणारा यशाचा अनुभव पुढेही कायम राहावा. त्याने मुंबई इंडियन्ससोबत करुन दाखवलं आहे आणि आता भारतासाठी करुन दाखवण्याची वेळ आली आहे,” असं सचिनने यावेळी सांगितलं.
अश्विनचं कौतुक
सचिन तेंडुलकरने यावेळी फिरकी गोलंदाज आर अश्विनचंही कौतुक केलं. “अश्विनचा अनुभव आणि ज्याप्रकारे तो गोलंदाजीत बदल करण्याच्या त्याच्या क्षमतेने मला खूपच प्रभावित केलं आहे. टी-२० तही त्याने चांगली कामगिरी केली असून आपल्या गोलंदाजीत अनेक बदल दाखवले आहेत,” असं सचिनने म्हटलं.
सचिनने यावेळी दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी असणारी गोलंदाजी संतुलित असल्याचं सांगितलं आहे. संघात वेगवेगळ्या गतीचे गोलंदाज असून त्याच्यात २० विकेट घेण्याची क्षमता असल्याचं सचिनने सांगितलं आहे.
“गोलंदाजांमध्ये २० विकेट घेण्याची क्षमता”
“गोलंदाजीत आपलं आक्रमण संतुलित असेल. आपल्याकडे वेगवेगळे जलद गोलंदाज आहेत. बुमराह, सिराज, शार्दूल, उमेश या सर्वांची शैली वेगळी आहे. त्यात इशांतचा अनुभवही फायद्याचा ठरेल. आणि हे सर्व त्या दिवशी काय स्थिती आहे त्यावर अवलंबून असेल. कारण आपले अनेक खेळाडू जखमी झाले असून यात फिरकी गोलंदाज आहेत. जर गोलंदाज चांगला खेळत असले तर त्याने जास्तीत जास्त खेळलं पाहिजे. आणि मी जे पाहिलं आहे त्यातून आपल्या गोलंदाजांमध्ये २० विकेट घेण्याची क्षमता आहे,” असं सचिनने म्हटलं.
कोहलीच्या कर्णधारपदाबाबत गांगुलीचे भाष्य अनावश्यक! भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे मत
२६ डिसेंबरपासून मालिकेला सुरुवात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आधी १७ डिसेंबरपासून खेळवला जाणार होता. मात्र, आफ्रिकेतील ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा दौरा नऊ दिवस लांबणीवर पडला. भारतीय खेळाडूंनी आता सरावाला सुरुवात केली असली तरी त्यांना विविध र्निबधांचे पालन करावे लागत आहे.