भारतीय संघ हा अत्यंत संतुलित आहे. त्यामुळे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिनने व्यक्त केले होते. त्यानंतर आता भारतीय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांची सचिनने स्तुती केली आहे.
पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे दोघे तरुण आणि तडफदार खेळाडू आहेत. या दोघांमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे. पृथ्वी शॉ टीम इंडियात खेळणार याचा मला आधीच अंदाज होता. तो आठ-नऊ वर्षांचा होता, तेव्हापासून मी त्याला खेळताना पाहिले आहे. त्याच्यात काहीतरी विशेष होते आणि तो भविष्यात भारतीय संघाकडून खेळेल, असे मी आधीच म्हणालो होतो, असे सचिन म्हणाला.
शुभमन गिलबाबत बोलताना तो म्हणाला की शुभमनने गेल्या वर्षी १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक क्रिकेटमध्येदेखील त्याने उत्तम खेळ करून दाखवला आहे. याच बळावर त्याला टीम इंडियातही स्थान मिळाले आहे. या दोघांमध्ये चांगला खेळ करून दाखवण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी फक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटावा, असेही सचिन म्हणाला.