विशाखापट्टणम : सूर्यकुमार यादवला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवाला मागे सारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचे नेतृत्व करावे लागेल. विश्वचषकाच्या पराभवाला विसरणे सोपे नाही. तसेच, मालिका अवघ्या तीन दिवसांच्या अंतराने होत असल्याने सूर्यकुमारला आत्ममंथन करण्याची संधीही मिळणार नाही. मात्र, ट्वेन्टी-२० हे सूर्यकुमारचे आवडते प्रारूप असून तो या मालिकेत खेळण्यासाठी सज्ज असेल.
कर्णधार म्हणून विजय मिळवण्यासोबत युवा खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन देण्याचे असेल. गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या नावाचा या छोटया प्रारूपासाठी विचार केला गेलेला नाही आणि या मालिकेच्या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी निवड समितीला मदत होणार आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना मालिकेत चांगली कामगिरी करत निवड समितीला आकर्षित करण्याची संधी आहे.
हेही वाचा >>> IPL 2024: आवेश खान-देवदत्त पडिक्कलसाठी राजस्थान आणि लखनऊने घेतला मोठा निर्णय! आता ‘या’ संघासाठी खेळणार
यशस्वी, रिंकू, तिलककडून अपेक्षा
युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि मुकेश कुमारसारख्या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. रिंकूने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात प्रभावित केले आहे. यशस्वी, तिलक व मुकेश यांनीही चांगला खेळ केला आहे. तर, आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान पदार्पण करणाऱ्या जितेशला इशान किशनमुळे काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. भारताच्या या खेळाडूंनी आतापर्यंत वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तुलनेने कमकुवत आक्रमणाचा सामना केला आहे. भारताला ‘आयपीएल’पूर्वी ११ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहे. ‘आयपीएल’ स्पर्धेनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होईल. व्हीव्हीएस लक्ष्मण या मालिकेसाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. तसेच शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करणार असल्याने शीर्ष क्रमासाठी पर्याय भारताकडे राहतील. ऋतुराज गायकवाडसह जैस्वाल किंवा इशानपैकी कोणी एक जण डावाची सुरुवात करेल. सूर्यकुमार तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी फलंदाजी करू शकतो. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात एकदिवसीय प्रारूपाच्या तुलनेने अनेक डावखुरे फलंदाज आहेत. यशस्वी, किशन, तिलक वर्मा, रिंकू यांच्यासह अष्टपैलू अक्षर पटेल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांचाही समावेश आहे. गोलंदाजांमध्ये रवी बिश्नोईला अधिक सामने खेळण्यास मिळू शकतात. तसेच, वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार व अर्शदीप सिंग यांनाही चांगली संधी असेल.
हेड, मॅक्सवेलकडे लक्ष
नुकताच ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक उंचावल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. याच संघातील काही खेळाडू ट्वेन्टी-२० मालिकेत सहभाग नोंदवणार असल्याने ऑस्ट्रेलियन संघ मजबूत दिसत आहे. ट्वेन्टी-२० संघात ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, लेग स्पिनर अॅडम झ्ॉम्पा आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. याशिवाय ‘आयपीएल’मध्ये चांगली कामगिरी करणारे मार्कस स्टोइनिस, नेथन एलिस, टिम डेव्हिडसारखे आक्रमक खेळाडू आहेत. संघात प्रमुख वेगवान गोलंदाज नसले तरीही, मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखालील संघ भक्कम दिसत आहे. त्यामुळे केन रिचर्डसन, एलिस, सीन अॅबट व जेसन बेहरनडॉर्फ यांच्या गोलंदाजीचा चांगला कस लागेल.
भारत
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया
मॅथ्यू वेड (कर्णधार), आरोन हार्डी, जेसन बेहरनडोर्फ, सीन अॅबट, टिम डेव्हिड, नेथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा.
वेळ : सायं. ७ वा. थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा