बर्मिगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील स्पर्धाना शुक्रवारपासून सुरुवात होत असून यंदा प्रथमच होणाऱ्या महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारतासमोर जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.
भारतीय महिला संघाची सध्याची लय पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्याची संधी आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत हरमनप्रीतने सक्षमपणे भारताचे नेतृत्व केले आहे. भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवायचे झाल्यास स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांना कामगिरी उंचवावी लागेल. अष्टपैलू पूजा वस्त्रकारकडून संघाला योगदानाची अपेक्षा असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने विजय मिळवल्यास पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीत भारतावर कमी दडपण असेल.
दुसरीकडे, स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार समजला जात आहे. मेग लॅिनगच्या नेतृत्वाखाली खेळणारा कांगारूंचा संघ कोणत्याही संघाला पराभूत करण्यात सक्षम आहे. लॅिनगची कामगिरी ही संघासाठी निर्णायक ठरू शकते. यासह तहलिया मॅकग्राही संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडू शकते. संघात अष्टपैलू खेळाडूंचाही चांगला भरणा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभूत करायचे झाल्यास भारताला सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल.
महिला हॉकी : भारत-घाना आमनेसामने
विश्वचषक हॉकी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीला मागे सारत भारतीय महिला हॉकी संघ शुक्रवारी स्पर्धेत कमकुवत समजल्या जाणाऱ्या घानाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतासह यजमान इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना या संघांचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. स्पर्धेच्या गेल्या हंगामात भारताला पदक जिंकता आले नव्हते.
’ वेळ : सायं. ६.३० वा.
बॉक्सिंग : शिवा थापावर नजरा
माजी आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेता शिवा थापासमोर (६० ते ६३.५ किलो वजनी गट) पहिल्या फेरीत पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचे आव्हान असेल. रोहित टोकस (६३.५ ते ६७ किलो वजनी गट), सुमित कुंडू (७१ ते ७५ किलो वजनी गट) आणि आशिष कुमार (७५ ते ८० किलो वजनी गट) यांना दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.
’ वेळ : सायं. ५ वा.
टेबल टेनिस : सांघिक सामन्यांना प्रारंभ
भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस सांघिक गटाच्या पहिल्या फेरीला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. महिला संघात मनिका बत्रा, स्रीजा अकुला, रिथ रिश्या, दिया चितळे यांचा समावेश आहे. शरथ कमल, साथियान ज्ञानसेकरन, हरमीत देसाई आणि सुनील शेट्टी यांचा सहभाग असलेला पुरुष संघ आव्हान उपस्थित करेल.
’ वेळ : दुपारी ४.३० वा.
स्क्वॉश : सौरव, जोश्नावर मदार
स्क्वॉशमध्ये पुरुष आणि महिला एकेरीच्या लढतींना शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. पुरुष एकेरीत रमित तंडन, सौरव घोषाल आणि अभय सिंग आव्हान उपस्थित करतील. महिलांमध्ये जोश्ना चिनप्पा, अनाहत सिंग आणि सुनन्या कुरुविलावर मदार असेल.
’ वेळ : रात्री ११.४५ वा.
जलतरण : नटराज, साजनकडून अपेक्षा
साजन प्रकाश (५० मीटर बटरफ्लाय), आशिष कुमार सिंग (१०० मीटर बॅकस्ट्रोक), श्रीहरि नटराज (१०० मीटर बॅकस्ट्रोक) आणि कुशाग्र रावत (४०० मीटर फ्रीस्टाइल) हे जलतरण मोहिमेला शुक्रवारी सुरुवात करतील.
’ वेळ : दुपारी २.४० वा.
बॅडिमटन : सांघिक स्पर्धाना सुरुवात
बॅडिमटनमध्ये भारताला सुवर्णपदकाची आशा आहे. मिश्र सांघिक गटामध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होईल.
’ वेळ : सायं. ६.३० वा.