ॲडलेड : पर्थ कसोटीतील विक्रमी कामगिरीनंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय क्रिकेट संघ आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचे ध्येय बाळगून मैदानात उतरेल. ॲडलेड येथे प्रकाशझोतात (डे-नाइट) होणाऱ्या या कसोटीत गुलाबी चेंडूचे आव्हान भारतासमोर असेल. मात्र, भारताने सामन्याच्या पूर्वसंध्येला आपला फलंदाजी क्रम जाहीर करताना आपण या आव्हानासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीचा क्रम कसा असणार? सलामीला रोहित खेळणार की केएल राहुल? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा ध्यैर्याने सामना करणाऱ्या राहुललाच सलामीला पाठविण्यात येणार असल्याचे रोहितने गुरुवारी सांगितले. त्यामुळे भारताला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहुल आणि पर्थ कसोटीतील दीडशतकवीर यशस्वी जैस्वाल यांच्यावरच असेल.
मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका ०-३ अशी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाकडून कोणालाही फारशी अपेक्षा नव्हती. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतावर वर्चस्व गाजवेल असे भाकीत जाणकारांकडून केले जात होते. मात्र, ते पूर्णपणे फोल ठरले. भारताने ऑस्ट्रेलियन भूमीतील आपला सर्वांत मोठा (२९५ धावांनी) विजय मिळवला. मात्र, ॲडलेडमध्ये प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळणे किती आव्हानात्मक आहे, हे भारतीय संघ जाणतो.
हेही वाचा >>> IND vs AUS 2nd Test: ठरलं! रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर फलंदाजीला उतरणार, भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल
गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड येथे झालेल्या कसोटीत भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला होता. ‘डे-नाइट’ कसोटीत संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करणे सर्वांत अवघड मानले जाते. तसेच लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडू टणक असल्याने त्याला अधिक उसळी मिळते आणि तो अधिक स्विंगही होतो. या परिस्थितीत एरवी सलामीला येणाऱ्या कर्णधार रोहितने मधल्या फळीत खेळणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल.
दुसरीकडे, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघासमोर बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा तारांकित वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड कंबरेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्याची उणीव ऑस्ट्रेलियाला निश्चित जाणवेल. त्याच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलँडला साधारण दीड वर्षानंतर कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.
राहुलच सलामीला, मी मधल्या फळीत –रोहित
ॲडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलामीला येताना केएल राहुलने दाखवलेला संयम आणि त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा प्रभावित झाला. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या प्रकाशझोतातील (डे-नाइट) कसोटी सामन्यासाठीही रोहितने राहुलला सलामीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीच अपत्यप्राप्ती झाल्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियात उशिराने दाखल झाला. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत सलामीला येताना राहुलने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने दोन डावांत अनुक्रमे २६ आणि ७७ धावांची खेळी केली. शिवाय त्याने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालच्या साथीने २०१ धावांची सलामीही दिली.
‘‘अॅडलेड कसोटीत राहुलच सलामीला येईल. मी मधल्या फळीतील कोणत्या तरी क्रमांकावर खेळेन. या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मला फार विचार करावा लागला नाही. संघ म्हणून आम्हाला यश हवे आहे. सकारात्मक निकालानंतर फलंदाजी क्रमाशी छेडछाड करणे योग्य ठरणार नाही असे मला वाटले. माझ्या दृष्टीने संघहित सर्वांत महत्त्वाचे आहे,’’ असे रोहितने गुरुवारी सांगितले.
गिलचेही पुनरागमन
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन बदल होणार हे निश्चित आहे. कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिलचेही पुनरागमन होणार आहे. हे दोघे देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांची जागा घेतील. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला खेळणार असून गिल तिसऱ्या क्रमांकावर येणे अपेक्षित आहे. गुलाबी चेंडू अधिक स्विंग आणि सीम होत असल्याने या आघाडीच्या तीन फलंदाजांची ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर कसोटी लागेल. गोलंदाजीत बदल होणे अपेक्षित नाही. त्यामुळे अश्विन आणि जडेजा यांना पुन्हा संघाबाहेर राहावे लागेल, तर फिरकीची धुरा वॉशिंग्टन सुंदरच सांभाळेल. ॲडलेड येथील खेळपट्टीकडून फिरकीला मदत मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे सुंदरची भूमिका निर्णायक ठरू शकते.
लबूशेन, स्मिथकडे लक्ष
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघावर दमदार पुनरागमनासाठी दडपण असेल. ऑस्ट्रेलियासाठी प्रमुख फलंदाजांची कामगिरी हा चिंतेचा विषय ठरत आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन हे गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडत आहेत. पर्थ कसोटीत या दोघांना बुमराने निष्प्रभ केले होते. विशेषत: लबूशेनची कामगिरी फारच निराशाजनक ठरते आहे. या वर्षभरात खेळलेल्या सहा कसोटींच्या १२ डावांत लबूशेनला केवळ तीन अर्धशतके करता आली आहेत. त्यामुळे त्याचे स्थान धोक्यात असल्याचे मानले जात आहे. लबूशेनने याआधी अॅडलेडमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला सूर गवसेल अशी ऑस्ट्रेलियाला आशा असेल. हेझलवूडच्या अनुपस्थितीत कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावरील जबाबदारी वाढेल. फिरकीची धुरा नेथन लायन सांभाळेल.