३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणारा विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्न सुटलेला नाहीये. गेल्या वर्षभरात भारतीय संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी अनेक प्रयोग केले. २०१८ पासून अंबाती रायुडू, धोनी, केदार जाधव आणि मनिष पांडे या फलंदाजांना वेगवेगळ्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याच्या मते, अंबाती रायुडू हा भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य उमेदवार आहे.
“माझ्यासाठी रायुडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य पर्याय आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. भारत चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी इतकी चर्चा का करतोय हे समजत नाही. लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकाची जागा मिळेल असं मला वाटत नाही. त्याची संघातली जागा ही पर्यायी सलामीवीर म्हणून योग्य आहे.” टाईम्स ऑफ इंडियाशी बोलत असताना हेडनने आपलं मत मांडलं.
अवश्य वाचा – विराट कोहली कर्णधार म्हणून धोनीवर अवलंबून – अनिल कुंबळे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, कर्णधार विराट कोहलीने विश्वचषकासाठीचा संघ निश्चीत झाल्याचं म्हटलं होतं. केवळ एका जागेसाठी भारतीय संघात चर्चा सुरु असल्याचं कोहली म्हणाला होता. त्यामुळे कोणत्या खेळाडूला भारतीय संघात जागा मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.