Matthew Breetzke World Record on ODI Debut: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी सध्या पाकिस्तानमध्ये तीन संघांमध्ये तिरंगी मालिका खेळवली जात आहे. यामध्ये पाकिस्तानशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सहभागी झाले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रिट्झकेने अशी कामगिरी केली आहे, जी कोणत्याही फलंदाजासाठी अगदी स्वप्नवत असते. दक्षिण आफ्रिका संघाकडून त्याला पदार्पणाची संधी मिळाली आणि पदार्पणातच त्याने शतक झळकावले आहे. फक्त शतक झळकावून तो थांबला नाही १५० धावांची मोठी खेळी करत त्याने विश्वविक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॅथ्यू ब्रिट्झकेने वनडेमध्ये पदार्पण करताना सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने १५०धावा केल्या, त्याआधी जगातील कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने जवळपास ४७ वर्षे जुना विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

मॅथ्यू ब्रिट्झके हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवीन नाव आहे, तो दक्षिण आफ्रिकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामने खेळला आहे, परंतु आज त्याने प्रथमच वनडेसाठी मैदान पाऊल ठेवले. त्याला कर्णधार टेम्बा बावुमासह सलामीची संधी मिळाली. मात्र, संघाची धावसंख्या केवळ ३७ धावांवर असताना टेम्बा बावुमा केवळ २० धावा करून बाद झाला. यानंतरही ठराविक अंतराने संघाने विकेट गमावल्या, पण मॅथ्यू ब्रिट्झके थांबला नाही. त्याचं पूर्ण लक्ष शक्य तितक्या काळजीपूर्वक धावा करण्यावर होतं. मॅथ्यूने आधी आपलं शतकं झळकावलं आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पणात सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा खेळाडू ठरला.

दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पणात वनडे शतक झळकावणारे फक्त तीन फलंदाज होते, पण आता त्यांची संख्या आता चार झाली आहे. कॉलिन इंग्रामने २०१० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले, तेव्हा त्याने १२४ धावांची शानदार खेळी खेळली होती. यानंतर टेम्बा बावुमाने २०१६ मध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले आणि ११३ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या यादीत तिसरे नाव आहे रीझा हेंड्रिक्सचे. त्याने २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ०१२ धावा केल्या होत्या.

आता मॅथ्यू ब्रिट्झके या सगळ्यांच्या पुढे गेला आहे. त्याने १२५ धावा केल्यानंतर कॉलिन इंग्रामला मागे टाकले. यानंतरही तो धावा करत राहिला आणि काही वेळातच त्याची धावसंख्या १५० पर्यंत पोहोचली. त्याने १४९ धावांचा आकडा पार करताच विश्वविक्रमही आपल्या नावे केला.

मॅथ्यू ब्रिट्झकेचा वर्ल्ड रेकॉर्ड

१९७८ मध्ये, वेस्ट इंडिजच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या डेसमंड हेन्स यांनी पदार्पणात १४८ धावांची खेळी केली होती. त्यावेळचा हा विश्वविक्रम आता मोडला आहे. सुरुवातीला मॅथ्यू संथ फलंदाजी करत होता, पण त्यानंतर त्याने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. १५० धावा करताच त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र, याआधी त्याने १४८ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि ५ षटकार लगावत वादळी खेळी केली.

एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

१५० धावा – मॅथ्यू ब्रिट्झके (दक्षिण आफ्रिका) वि. न्यूझीलंड, लाहोर, २०२५
१४८ धावा – डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज) वि. ऑस्ट्रेलिया, सेंट जॉन्स, १९७८
१२७ धावा – रहमानउल्ला गुरबाझ (अफगाणिस्तान) वि.आयर्लंड अबू धाबी, २०२१
१२४ धावा – मार्क चॅपमन (हाँगकाँग) वि. यूएई दुबई, २०१५
१२४ धावा – कॉलिन इंग्राम (दक्षिण आफ्रिका) वि. झिम्बाब्वे ब्लोमफॉन्टेन, २०१०

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matthew breetzke world record with 150 runs inning on odi debut for south africa in pakistan tri series against nz bdg