International Debut At Age of 62: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारच कमी खेळाडू आहेत जे वयाच्या ४०व्या वर्षीही खेळले आहेत. वयाची ४० वर्षे पूर्ण होईपर्यंत खेळाडू निवृत्तीची घोषणा करतात. वयाच्या चाळीशीनंतरही अनेक खेळाडू जगभरातील लीगमध्ये खेळत आहेत पण त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम झाला आहे. एका खेळाडूने वयाच्या ६२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
क्रिकेटपटू मॅथ्यू ब्राऊनली याने वयाच्या ६२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. फॉकलंड आयलंड वि. कोस्टा रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात हे आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले. हा सामना १० मार्च २०२५ रोजी गुवासीमा येथे खेळला गेला होता. फॉकलंड आयलंड संघाचा हा पहिला सामना होता. या सामन्यात ६२ वर्षीय मॅथ्यू ब्राउनलीने या सामन्यात पदार्पण केले.
फॉकलंड आयलंड हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा १०६ वा संघ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संघाच्या पहिल्याच सामन्यात मैदानात उतरलेल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये सर्व खेळाडूंचे वय ३१ वर्षांपेक्षा जास्त होते. त्याच वेळी, मॅथ्यू ब्राउनली हा सर्वात वयस्कर खेळाडू होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याने उस्मान गोकरचा विक्रम मोडला. गोकरने २०१९ मध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी इलफोव काउंटीसाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वयाची ६० ओलांडल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा ब्राऊनली हा पहिला खेळाडू ठरला आहे. या दौऱ्यात मॅथ्यू ब्राउनलीने एकूण ३ टी-२० सामने खेळले. यावेळी १०व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने पहिल्या सामन्यात १ धाव, दुसऱ्या सामन्यात २ नाबाद धावा आणि तिसऱ्या सामन्यात ३ नाबाद धावा केल्या. याशिवाय त्याने एक षटकही टाकले. मात्र त्याला विकेट मिळवता आली नाही.
फॉकलंड आयलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात चांगली झाली नाही. फॉकलंड आयलंड आणि कोस्टा रिकामध्ये या मालिकेत सहा सामने खेळले गेले. फॉकलंडला फक्त एकच सामना जिंकता आला. पहिल्या सामन्यात संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. ५ सामने कोस्टा रिका संघाच्या नावावर होते. ज्या सामन्यात फॉकलंड आयलंडने विजय मिळवला त्या सामन्यात मॅथ्यू ब्राउनली प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.