आस्ट्रेलियाया माजी सलामीवीर आणि आक्रमक फलंदाज मॅथ्यू हेडनने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठं विधान केलं आहे. हेडने म्हटलंय की, आगामी होणाऱ्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज मोठ्या जल्लोषात कर्णधार एम एस धोनीचं स्वागत करणार आहे. कारण सीएसकेचा लोकप्रीय कर्णधार धोनीचा यंदाचा आयपीएल सीजन शेवटचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धोनीने २००८ मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून सीएसकेचा कर्णधारपद भुषवलं आहे. विशेष म्हणजे धोनीच्या नेतृत्वात सीएसकेला आयपीएलमध्ये चारवेळा जेतेपद मिळालं आहे.
हेडनने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, टुर्नामेंटमध्ये विजय मिळवण्यासाठी सीएसके वेगवेगळे पर्याय शोधण्यात यशस्वी ठरली आहे. दोनवेळा टुर्नामेंटमधून बाहेर राहणं दुर्भाग्यपूर्ण होतं. पण त्यानंतर पुन्हा वापसी करून आयपीएलमध्ये विजय संपादन केलं. अशाप्रकारे विजय मिळेल याची अपेक्षा नव्हती. संघाला मजबूत करण्यासाठी तसेच संघात आवश्यक त्या सुधारणा करण्यात एम एस धोनीकडे एक वेगळा अंदाज आहे. धोनीच्या नेतृत्वात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळे काही खेळाडूंवर विश्वासार्हतेचा टॅग लागला होता.
हेडने धोनीच्या निवृत्तीबाबत बोलताना म्हटलं की, मला वाटतंय एम एस धोनीसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. त्यामुळं यंदाचं वर्ष जल्लोषात साजरं केलं जाईल. यंदाचं आयपीएल सीजन एम एस धोनीसाठी निवृत्ती घोषीत करण्याचं असू शकतो. धोनीला त्याच्या स्टाईलमध्ये निवृत्ती जाहीर करणं अधिक आवडेल. तसंच धोनीने निवृत्ती घोषीत केल्यानंतर चाहते आणि सीएसकेकडूनही भरभरून प्रेम दिलं जाईल.
आयपीएलचा आगामी सीजन ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. हेडनने चेपक स्टेडियममध्ये सीएसकेच्या पुनरागमनाबद्दल म्हटलं, २०२३ मध्ये आयपीएल सुरु होईल. कोविड १९ नंतर संपूर्ण भारतात सामने खेळवण्यात येतील. स्टेडियमध्ये पिवळ्या जर्सीतील सीएसकेचे चाहते पाहणं, हे खूप छान असेल. धोनीचा एक खेळाडू म्हणून यंदाचं आयपीएल शेवटचा सीजन असेल. धोनीही चेपक स्टेडियममध्ये त्याच्या चाहत्यांना गुडबाय करतील. तो क्षण अविस्मरणीय असेल. त्यावेळी क्रिकेटप्रेमी किती मोठ्या संख्येत स्टेडियममध्ये पोहोचतील, याचा अंदाजही लावता येणार नाही. भारताला धोनीने दोन विश्वकप जिंकून दिले आहेत. त्याने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.