ऑस्ट्रेलियाचा माजी तडाखेबाज सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनचे भारताशी गेल्या अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध राहिले आहेत. हेडननं भारतात क्रिकेट खेळायला आणि भारतात यायला आपल्याला नेहमीच आवडत असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. त्यामुळे हेडनचं भारताशी आगळं-वेगळं नातं निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅथ्यू हेडनला पत्र पाठवलं आहे. ख्रिस गेल, जाँटी ऱ्होड्स आणि केविन पीटरसननंतर मॅथ्यू हेडन पंतप्रधानांकडून असं पत्र पाठवण्यात आलेला चौथा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. यानंतर मॅथ्यू हेडननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यातून त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्टमध्ये मॅथ्यू म्हणतो…
“भारतानं माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. आपल्या दोन्ही महान राष्ट्रांमधील संबंध अधिकाधिक वृद्धिंगत व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याच्या माझ्या भूमिकेचा मी मनापासून स्वीकार करत आहे. भारत ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हे पत्र मिळणं हा मी माझा सन्मान समजतो. लोकशाही आणि मानवी हक्कांचं संरक्षण करण्यात राज्यघटनेची भूमिका भारतात नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. मला भारत आवडतो. इथली विविधता, बदल स्वीकारण्याची इथली वृत्ती, संस्कृतीचं संरक्षण आणि वृद्धी करण्याची क्षमता यांचा मी कायमच चाहता राहिलो आहे”, असं मॅथ्यूनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेल्या पत्राचा फोटो देखील मॅथ्यूनं शेअर केला असून “भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे”, असं त्यात नमूद केल्याचं दिसत आहे. या पत्राच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वाक्षरी देखील आहे.
“या वर्षी ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र होण्याच्या घटनेला ७५ वर्ष देखील पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मी तुम्हाला आणि इथर काही मित्रांना पत्र लिहिण्याचं ठरवलं. भारतावर तुम्ही केलेल्या प्रेमासाठी धन्यवाद देण्याचा हा एक मार्गच ठरावा. मला आशा आहे की तुम्ही आमच्या देशासोबत आणि आमच्या लोकांसोबत अशाच प्रकारे काम करत राहाल”, असं या पत्रात मोदींनी म्हटलं आहे.