आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत जेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयाचे हिरो ठरले. डेव्हिड वॉर्नर ३० चेंडूत ४९ धावांवर असताना शादाब खानच्या गोलंदाजीवर यष्टीपाठी झेलबाद झाला. हा चेंडू वॉर्नरच्या बॅटला लागला नसल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. पण तरीही वॉर्नर तंबूत परतला. या गोष्टीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरकवणाऱ्या मॅथ्यू वेडने या घटनेमागील रहस्य उलगडले आहे. वॉर्नरने डीआरएस का घेतला नाही, यावर वेड म्हणाला, ”’हो, आम्हाला याबद्दल जास्त बोलायला वेळ मिळाला नाही. फक्त एक दोन गोष्टी घडल्या, मला वाटते की काहीतरी आवाज आला, वॉर्नरलाच खात्री नव्हती की तो नेमका कसला आवाज आहे. चेंडू बॅटला लागला असे त्याला वाटत नव्हते, पण नॉन-स्ट्रायकर एंडवर मॅक्सवेलला काही आवाज ऐकू आला. अशा परिस्थितीत हे समजणे फार कठीण आहे. मॅक्सवेलने वॉर्नरला डीआरएस घेण्यास मनाई केली. नंतर अल्ट्राएजवर समजले की चेंडू बॅटला लागला नाही.”
हेही वाचा – मोठी बातमी..! न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; मराठी माणूस करणार नेतृत्व!
वॉर्नरची विकेट पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची होती. यानंतर पाकिस्तानने ९६ धावांत पाच विकेट्स घेत सामन्यावर पकड घट्ट केली. मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेड यांनी मिळून पाकिस्तानच्या तोंडातून विजयी घास हिरावून घेतला. पाकिस्तानकडून शादाबने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत २६ धावांत चार बळी घेत पाकिस्तानला मजबूत स्थितीत आणले, ११व्या षटकात वॉर्नर माघारी परतला.
असा रंगला सामना…
टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.