परंतु आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी रविवारी झालेल्या लिलावात या युवा अष्टपैलू खेळाडूने सर्वाधिक एक दशलक्ष डॉलर एवढी किंमत मिळवून मॅक्स‘वेल डन’ची प्रचीती दिली. मुंबई इंडियन्सने त्याची खरेदी केली.
या लिलावात नव्या आणि युवा खेळाडूंना चांगले भाव मिळाले, तर जुन्याजाणत्या खेळाडूंकडे फ्रँचायझींनी पाठ फिरवल्याचे प्रत्ययास आले. २४ वर्षीय मॅक्सवेलने जाणकारांचे सारे अंदाज मातीमोल ठरवले. मॅक्सवेलसाठी मुंबई इंडियन्सशी विशेष स्पर्धा होती ती हैदराबाद सनरायजर्सची. मात्र त्याच्यासाठी अनपेक्षितरीत्या एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (५.३ कोटी रु.) मोजून मुंबई इंडियन्सने हा मोहरा खिशात घातला. आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी १०८ खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होते, यापैकी फक्त ३७ खेळाडूंना संघ मिळविण्यात यश प्राप्त झाले. याकरिता नऊ फ्रँचायझींनी ११.८९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवले. आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठीच्या लिलावात खरेदी केल्याप्रमाणे खरेदी न केलेल्या खेळाडूंची यादी मोठी होती. ऑस्ट्रेलियाचा डग बोलिंगर आणि श्रीलंकेच्या रंगना हेराथ या ताऱ्यांकडे मात्र फ्रँचायझींनी पाठ फिरवली.
या लिलावात अष्टपैलू खेळाडूंना विशेष मागणी होती, तर अखेरच्या सत्रात क्विंटन डी’कॉक (२० हजार अमेरिकन डॉलर्स) या फक्त एका यष्टिरक्षकाला हैदराबाद सनरायजर्स हा खरेदीदार मिळाला.
यंदाच्या लिलावात मायकेल क्लार्क आणि रिकी पाँटिंग या ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी यशस्वी कर्णधारांचा ‘बोलबाला’ होईल अशी चर्चा होती, परंतु हे दोन्ही खेळाडू त्यांच्या आधारभूत किंमतीलाच म्हणजे ४ लाख अमेरिकन डॉलर्स (२.१ कोटी) अनुक्रमे पुणे वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्सला विकले गेले.  
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस्टोफर मॉरिसच्या गाठीशी फक्त एका ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव, परंतु आयपीएलच्या व्यासपीठावर मात्र मॉरिसला चेन्नई सुपर किंग्जने ६ लाख २५ हजार अमेरिकन डॉलर्सचा भाव देऊन स्वागत केले आहे. आश्चर्यकारक म्हणजे २० हजार अमेरिकन डॉलर्स इतकी त्याची आधारभूत किंमत होती. चेन्नईने मुंबई इंडियन्स आणि बंगळुरूचे आव्हान झुगारत मॉरिसला आपल्या चमूत आणण्यात यश मिळवले.
नव्या ताज्या दमाच्या खेळाडूंची आयपीएलमधील लाटेने आणखी एक धक्का दिला तो श्रीलंकेचा ऑफ-स्पिनर सचित्रा सेनानायकेच्या खरेदीने. ५० हजार अमेरिकन डॉलर्स या आधारभूत किमतीनिशी लिलावात उतरलेल्या सेनानायकेसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नईने जंग जंग पछाडले, परंतु कोलकाता नाइट रायडर्सने ६ लाख २५ हजार अमेरिकन डॉलर्सला (३.३ कोटी रु.) बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कल्टर निलेला १ लाख अमेरिकन डॉलर्स ही आधारभूत किंमत लाभली होती, परंतु मुंबई इंडियन्सने ४ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्सला त्याला खरेदी केले. २५ वर्षीय निलेसुद्धा अजून आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.
लिलावाच्या या ‘बोली’युद्धात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन यानेही लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप पाऊल न ठेवलेल्या २१ वर्षीय रिचर्डसनसाठी १ लाख अमेरिकन डॉलर्स इतकी आधारभूत किंमत ठेवली होती, परंतु पुणे वॉरियर्सने अनपेक्षितपणे ७ लाख अमेरिकन डॉलर्सला (३.७ कोटी रु.) त्याला खरेदी करून सर्वानाच धक्का दिला.
लिलावाची प्रक्रिया जसजशी पुढे जात होती, तसतसे क्रिकेटविश्वासाठी एकेक धक्के बसत होते. श्रीलंकेचा जादुई फिरकी गोलंदाज अजंठा मेंडिस आणि ऑस्ट्रेलियाचा स्मृतीपल्याड गेलेला वेगवान गोलंदाज डर्क नेन्सने चांगली कमाई करीत सर्वाचे लक्ष वेधले. मेंडिसला पुणे वॉरियर्सने ७ लाख २५ हजार अमेरिकन डॉलर्स (३.८ कोटी रु.) हा भाव मोजला. याचप्रमाणे नेन्सला चेन्नई सुपर किंग्जने ६ लाख (३.१ कोटी रु.) अमेरिकन डॉलर्सला खरेदी केले. आश्चर्यकारक म्हणजे मेंडिसला ५० हजार अमेरिकन डॉलर्स, तर नेन्सला २० हजार अमेरिकन डॉलर्स आधारभूत किंमत ठरविण्यात आली होती.
वेस्ट इंडिजचा गोलंदाज फिडेल एडवर्ड्सला राजस्थान रॉयल्सने २ लाख १० हजार अमेरिकन डॉलर्स (१.१ कोटी रु.)ला खरेदी केले. याचप्रमाणे श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराला हैदराबाद सनरायजर्सने ३.५ कोटी रुपये भाव दिला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जोहान बोथला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्स (२.३ कोटी रु.) ला खरेदी केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीला हैदराबाद सनरायजर्सने ४ लाख २५ हजार अमेरिकन डॉलर्सला खरेदी केले.
मॅक्सवेल हा उदयोन्मुख युवा खेळाडू आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली करतो, याचप्रमाणे तो निष्णात क्षेत्ररक्षकही आहे. लिलावात सामील होण्यापूर्वी काही नावांचा आम्ही विचार केला होता आणि मॅक्सवेल यापैकी एक होता.
नीता अंबानी, मुंबई इंडियन्सच्या मालकीण
आयपीएलच्या लिलावाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता आम्ही कायम राखली आहे. याविषयी कुणाचीही तक्रार असेल, असे मला वाटत नाही. यंदाचा लिलाव हा फक्त काही संघांतील काही जागा भरण्यासाठी होता. पुढील वर्षी मात्र मोठा लिलाव असेल.
राजीव शुक्ला, आयपीएलचे अध्यक्ष

Story img Loader