ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या योगेश्वर दत्त तसेच हिंदकेसरी युद्धवीरसिंग यांनी अपेक्षेप्रमाणे येथे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पध्र्यावर विजय मिळविला. मात्र महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, समाधान घोडके यांना पराभव स्वीकारावा लागला.
वारजे माळवाडी परिसरात पुणे महानगरपालिकेने ही स्पर्धा आयोजित केली होती. योगेश्वरने पाकिस्तानच्या सलमान बट्ट याच्यावर ३-१ अशा गुणांनी मात केली. स्पर्धेतील अन्य सर्व कुस्त्या मातीवर घेण्यात आल्या होत्या मात्र योगेश्वरने मातीवर खेळण्यास नकार दिल्यामुळे त्याच्या कुस्तीकरिता मातीच्या आखाडय़ावर मॅट घालून त्यावर कुस्ती घेण्यात आली. योगेश्वरने ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविताना आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मोळी डाव टाकला होता तोच डाव त्याने येथेही वापरला. योगेश्वरच्या तुलनेत युद्धवीरसिंगने तुर्कस्तानच्या महंमद ताजमी याच्यावर आकर्षक विजय मिळविला. पहिल्या दोन मिनिटांमध्ये तो एक गुणाने पिछाडीवर होता. त्याने नंतरच्या दोन मिनिटांत एक गुण घेत बरोबरी साधली. शेवटच्या दोन मिनिटांच्या फेरीस सुरुवात झाली नाही तोच त्याने साल्तो डाव टाकून क्षर्णार्धात ताजमीला चीतपट केले.
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याच्याविरुद्ध पाकिस्तानच्या हमीद अली खान याने आपल्या उंचीचा फायदा घेत चंद्रहारला गुणांवर पराभूत केले. महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याला इराणच्या महंमदी याने चापल्यतेच्या जोरावर हरविले. इराणच्या त्रिकोस क्रोसी याला महेश वरुटे याने हप्ता डाव टाकून चीतपट केले. महाराष्ट्राच्या कांतीलाल जाधव याला तुर्कस्तानच्या अली बद्देशीर याने चीतपट केले. उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने नायजेरियाचा एकमेव स्पर्धक बोल्टीक याच्यावर प्रेक्षणीय निर्णायक विजय मिळविला. गोकुळ वस्ताद तालीमचा मल्ल रणजित नलावडे याने इराणच्या अरमान खान याला ३-० असे गुणांनी पराभूत केले. महाराष्ट्राच्याच राहुल खाणेकर याने पाकिस्तानच्या अली बट्ट याच्यावर मोळी डाव टाकून निर्णायक विजय मिळविला.
सचिन मोहोळ याला मात्र पाकिस्तानच्या महंमद बिलालविरुद्ध ०-३ असा तीन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्र केसरी सईद चाऊस याने अनुभवाच्या जोरावर पाकिस्तानच्या जुनेद खान याला ३-० असे गुणांनी हरविले.