राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेत ऑलिम्पिकपटू मायुखा जॉनीने तिहेरी उडीत, तर अनू राणीने भालाफेकीत स्पर्धा विक्रम नोंदविला.
मायुखाने (ओएनजीसी) तिहेरी उडीत १३.७८ मीटपर्यंत उडी मारली व २०११ मध्ये स्वत:च नोंदविलेला १३.७३ मीटर हा विक्रम मोडला. एम. ए. प्राजुषा (रेल्वे) व शिल्पा चाको (केरळ) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. रेल्वेची खेळाडू अनू राणीने भालाफेकीत ५८.८५ मीटर हा स्पर्धा विक्रम नोंदवितानाच स्वत:च दोन वर्षांपूर्वी केलेला ५४.३५ मीटर हा स्पर्धा विक्रम मोडला. सुमन देवी (उत्तर प्रदेश) व पूनम राणी (हरयाणा) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले.
पुरुष गटात गुजरातच्या बाबुभाई पानोचाने वीस किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. त्याने ही शर्यत एक तास ३३ मिनिटे ४४ सेकंदात पार केली. सेनादलाच्या जितेंदरसिंग व अंकितकुमार हे अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाचे मानकरी ठरले. उंच उडीत जगदीपसिंग (ओएनजीसी) हा विजेता ठरला, त्याने २.१६ मीटपर्यंत उडी मारली. एस. हर्षित (ओएनजीसी) व एस. श्रीनिश (सेनादल) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकाविले.
थाळीफेकीत सेनादलाच्या धर्मराजने (५६.१२ मी.) सोनेरी यश मिळविले. कृपालसिंग (ओएनजीसी) व अंशू राय (आयुर्विमा महामंडळ) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान घेतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा