एका सुंदर तरुणीचे प्रेम जिंकण्यासाठी दोन तरुणांमध्ये दावे-प्रतिदाव्यांची स्पर्धा रंगते आणि त्या स्पध्रेचे रूपांतर हाणामारीत होते. प्रेमाच्या या त्रिकोणाची कथा सर्वाच्याच परिचयाची आहे. चित्रपट, नाटक, कादंबरी या सर्व माध्यमांतून ती वारंवार आपल्यासमोर येते. या लढाईत एक जण हमखास बाजी मारणार, हे सर्वाना माहीत असते; पण तो विजेता कोण, याची उत्सुकता अखेपर्यंत असते. आजच्या क्रीडाविश्वातसुद्धा चतुर
१२ फेऱ्यांची ही लढत अमेरिकेतील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे खेळवण्यात आली. एका बाजूला ३८ वर्षीय मेवेदर, तर दुसऱ्या बाजूला ३५ वर्षीय पकिआओ एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी उत्सुक होते. ही लढत पाहण्यासाठी सामान्य प्रेक्षकांपेक्षा अती महत्त्वाच्या व्यक्तींचा जथ्थाच जमला होता. जस्टीन बिएबर, मार्क वॉल्हबर्ग, बेन अॅफलेक, जय झेड आणि बेयॉन्स आदी हॉलीवूडचे अभिनेते-अभिनेत्री याचपमाणे संगीत आणि फॅशन क्षेत्रातील दिग्गज जातीने एमजीएममध्ये हजर होते. या उपस्थितीमुळे या सामन्याला ऑस्करप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले. अपेक्षेप्रमाणे पकिआओ आणि मेवेदर यांनी एकमेकांना तोडीस तोड खेळ केला. अखेरच्या फेरीपर्यंत पकिआओला आपणच जिंकल्याचे वाटत होते, परंतु निकाल येताच त्याचा भ्रमनिरास झाला. त्याच्या चाहत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. ही लढत अमेरिकेत म्हणजेच मेवेदरच्या घरच्या प्रेक्षकांसमोर असल्यामुळे परीक्षकांनी त्याच्या बाजूने निकाल दिला, अशी बोंब मारली गेली. ती मेवेदरकडून टोलवली गेली. मग मेवेदरने चवताळून पकिआओसोबत पुन्हा लढण्याचे आव्हान स्वीकारले. या सर्व घडमोडींमध्ये कथेला कलाटणी देणारी बाब उघड झाली. ती म्हणजे पकिआओने डाव्या खांद्याची दुखापत लपवून मेवेदरचा सामना केला होता. या लढतीपूर्वी त्याच्याकडून भरून घेतलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने ही बाब जाणीवपूर्वक लपवल्याचे उघड झाले. त्यामुळे काही सुजाण नागरिकांनी त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. पकिआओने तमाम चाहत्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला. या सर्व प्रकारानंतर मेवेदरनेही पुन्हा लढत करण्याच्या वक्तव्यावरून घुमजाव केले. नेवाडा अॅथलेटिक आयोगालाही या दुखापतीबाबत माहिती होती आणि ही लढत पुढे ढकलण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. मात्र पकिआओ त्यास नकार देत सामन्याच्या एक तास पूर्वी वेदनाशामक औषधे घेऊन रिंगमध्ये उतरला. याला आयोगानेही विरोध केला. कारण अशा परिस्थितीत पकिआओला कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता होती. पकिआओला याची पर्वा नव्हती.
ही लढत होण्यासाठी आयोजकांना सात वषे प्रतीक्षा करावी लागली. २००९मध्ये हे दोन्ही बॉक्सिंगपटू यशाच्या शिखरावर होते आणि त्या वेळी ही लढत झाली असती तर चाहत्यांनाही इतिहासाचा साक्षीदार होण्यास आवडले असते. मात्र केवळ आर्थिक गणित जुळत नसल्यामुळे कधी पकिआओ, तर कधी मेवेदर लढण्यास नकार देत होते. ६ जून २००८मध्ये मेवेदरने निवृत्ती जाहीर केली. त्याच वर्षी २० सप्टेंबरला तो ऑस्कर डी ला होया याच्या विरोधात अखेरचा सामना खेळणार होता. मेवेदरच्या निवृत्तीनंतर पकिआओ जागतिक क्रमवारीत अव्वल बॉक्सिंगपटू झाला. ही बाब मेवेदरला थोडीशी खटकणारी होती. म्हणूनच २००९मध्ये मेवेदरने पकिआओला लढतीचे आव्हान दिले. १३ मार्च २०१० ही तारीखही ठरली, परंतु या लढतीतून येणाऱ्या उत्पन्नात ५०-५० टक्के असा वाटा मिळावा, अशी मागणी करीत पकिआओने माघार घेतली. मे २०१०मध्ये पुन्हा चर्चा झाली आणि पुन्हा आर्थिक कारणावरून बोलणी फिसकटली. याच दरम्यान मेवेदरने २०१० व २०११मध्ये विश्रांतीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर २ मे २०१५ रोजी मेवेदर आणि पकिआओ यांच्यातील लढतीला जवळपास १९१० कोटी रुपये बक्षीस रक्कम होती आणि ६३७ कोटी रुपये रक्कम ही प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला देण्यात आली. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती ही लढत होणे गरजेचे होते. त्यासाठी पकिआओला दुखापत लपवणे भागच होते. ही लढत सुरू असताना फिलिपाइन्सच्या रस्त्यारस्त्यांवर पकिआओचे चाहते मोठय़ा संख्येने जमा होऊन त्याच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. परंतु पकिआओच्या डोक्यात जिंकून मिळणाऱ्या बक्षीस रकमेचे आर्थिक नियोजन सुरू होते. त्या वेळी तो भावनाशून्य झाला आणि म्हणूनच दुखापतग्रस्त असतानाही रिंगमध्ये उतरला. अपेक्षेपेक्षाही या लढतीला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि हा आकडा ३१८५ कोटी रुपयांवर गेला. यातून विजेत्या मेवेदरने १७५२ कोटी रुपयांची, तर पकिआआने १२१० कोटी रुपयांची कमाई केली. २००८मध्ये गोल्फपटू टायगर वुड्सने सर्वाधिक ७९६ कोटी रुपये कमवले होते. आता हा विक्रम इतिहासजमा झाला असून यात मेवेदर आणि पकिआओ यांनी बाजी मारली. पण या बक्षीस रकमेपेक्षा दोघांनी आपल्या चाहत्यांची केलेल्या फसवणुकीमुळे ही लढत सर्वाच्या लक्षात राहिली.
याआधीही १९७१मध्ये ‘शतकातील सर्वोत्तम झुंज’ जो फ्राझियर आणि मोहम्मद अली या दिग्गजांमध्ये झाली होती. यातही मोठी आर्थिक गुंतवणूक होती, परंतु चाहत्यांची फसवणूक करण्याचा प्रकार त्यात घडला नव्हता. किंबहुना या दोन्ही खेळाडूंना तसे करणे योग्य वाटत नव्हते. काळ बदलला आणि खेळाडू अधिकाधिक व्यावसायिक झाले. त्यामुळेच क्रीडारसिकांच्या भावना खुंटीला टांगून ते फक्त स्वत:चा विचार करू लागले. परिणामी ‘शतकातील सर्वोत्तम झुंज’ म्हणून चर्चा झालेली झुंज प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्यच ठरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा