अल थुमामा : परिपूर्ण सांघिक खेळाच्या जोरावर फ्रान्सने पोलंडचे आव्हान ३-१ असे सहज परतवून लावत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.पूर्वार्धात जिरुड (४४वे मिनिट) आणि उत्तरार्धात किलियन एम्बापे (७४ आणि ९०+१ वे मिनिट) यांनी फ्रान्ससाठी गोल केले. पोलंडचा एकमात्र गोल भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर लेवांडोवस्कीने केला. जिरुडने या सामन्यात गोल करून फ्रान्ससाठी सर्वाधिक ५२ गोल करण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम थिएरी हेन्रीच्या (५१) नावावर होता.
पूर्वार्धात आघाडी मिळविल्यानंतर उत्तरार्धात फ्रान्सने कमालीचे वर्चस्व राखून सामना एकतर्फी केला. उत्तरार्धात पोलंडला फ्रान्सशी बरोबरी करता आली नाही. एम्बापेच्या ताकदवान आणि अचूक किकने उत्तरार्धात दोन वेळा पोलंडचा बचाव भेदला. विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्यांदाच फ्रान्स-पोलंड आमनेसामने आले होते.
त्यापूर्वी, मध्यंतराला जिरुडच्या गोलमुळे फ्रान्सने १-० अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतराला एक मिनिट असताना जिरुडने एम्बापेच्या पासवर फ्रान्ससाठी विक्रमी ५२वा गोल केला. पूर्वार्धाच्या मध्याला जिरुडला मोकळय़ा गोलकक्षात गोल करण्यात अपयश आले होते. त्याची भरपाई जिरुडने योग्य वेळी केली.
नक्की वाचा >> विश्लेषण: मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडेल अशी क्षमता फ्रान्सच्या किलियन एम्बापेमध्ये आहे का?
पूर्वार्धात पोलंडकडूनही गोल करण्याचे काही चांगले प्रयत्न झाले. मात्र, गोलरक्षक हुगो लॉरिसने पोलंडला निराश केले. एका क्षणी फ्रान्सवर होणारा गोल राफेल व्हरानने गोल लाइनवरून परतवून लावला होता.