वृत्तसंस्था, दोहा : गतविजेता फ्रान्स आणि इंग्लंड हे बलाढय़ संघ तब्बल ४० वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे उपांत्य फेरी गाठण्याचे लक्ष्य असेल. फ्रान्सचा आघाडीपटू किलियन एम्बापेला इंग्लंडचा संघ रोखू शकणार का, या प्रश्नाच्या उत्तरावर शनिवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीचा निकाल ठरू शकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल बाएत स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात तारांकित खेळाडूंचे द्वंद्व पाहायला मिळेल. फ्रान्सच्या आक्रमणाची धुरा एम्बापेसह ऑलिव्हिएर जिरूड व अ‍ॅन्टोन ग्रीझमान सांभाळतील, तर इंग्लंडच्या संघाच्या आक्रमणाची भिस्त कर्णधार हॅरी केनसह लयीत असणारे फिल फोडेन व बुकायो साका या युवकांवर असेल.

२३ वर्षीय एम्बापे संघात असताना फ्रान्सने विश्वचषक स्पर्धातील सर्व नऊ सामने जिंकले असून त्याने १२ गोलमध्ये थेट योगदान दिले आहे. यंदाच्या स्पर्धेत एम्बापेने चार सामन्यांत पाच गोल व दोन गोलसाहाय्य केले आहेत. उपउपांत्यपूर्व फेरीत एम्बापेच्या दोन गोलमुळे फ्रान्सने पोलंडचा ३-१ असा पराभव केला होता. आता एम्बापेला रोखण्याची जबाबदारी प्रामुख्याने इंग्लंडचा बचावपटू कायेल वॉकरवर असेल. एम्बापेला रोखण्यासाठी आवश्यक वेग वॉकरकडे आहे. मात्र, वॉकरने केलेली एक चूकही इंग्लंडला महागडी ठरू शकेल. त्याचप्रमाणे ज्युड बेलिंगहॅम आणि ऑरेलियन टिचोयुमेनी या युवा मध्यरक्षकांमधील झुंजही पाहण्यासारखी असेल. टिचोयुमेनीकडे चेंडूवर नियंत्रण मिळवून फ्रान्सच्या आघाडीपटूंसाठी संधी निर्माण करण्याची क्षमता आहे, तर बेलिंगहॅमने इंग्लंडच्या आतापर्यंतच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

फ्रान्स आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी यंदा विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. फ्रान्सने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्कवर मात केली. बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाल्यावर टय़ुनिशियाविरुद्ध फ्रान्सने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सने पोलंडला पराभूत केले. दुसरीकडे, इंग्लंडने साखळी फेरीत तुलनेने दुबळय़ा इराण आणि वेल्सचा पराभव केला, तर अमेरिकेने त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखले. मग उपउपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने सेनेगलवर मात करत आगेकूच केली. 

संभाव्य संघ

फ्रान्स : ह्यूगो लॉरिस; ज्युल्स कुंडे, राफेल वरान, डेयोट उपामेकानो, थिओ हर्नाडेझ; ऑरेलियन टिचोयुमेनी, अ‍ॅड्रियन रॅबिओ; ओस्मान डेम्बेले, अ‍ॅन्टोन ग्रीझमान, किलियन एम्बापे; ऑलिव्हिएर जिरूड

  • संघाची रचना : (४-२-३-१)

इंग्लंड : जॉर्डन पिकफर्ड; कायेल वॉकर, जॉन स्टोन्स, हॅरी मग्वायर, लुक शॉ; जॉर्डन हेंडरसन, डेक्लन राईस, ज्युड बेलिंगहॅम; बुकायो साका, हॅरी केन, फिल फोडेन ल्ल संघाची रचना : (४-३-३)

  • वेळ : मध्यरात्री १२.३० वाजता
  • थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, १ एचडी, स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mbappe vs england france star striker in today quarter final clash ysh