मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणूक ऑक्टोबरपूर्वी होण्याची शक्यता नसल्याचे अध्यक्ष रवी सावंत यांनी बुधवारी सांगितले. ‘‘एमसीएचे लेखापरीक्षण सप्टेंबपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ऑक्टोबरआधी ही निवडणूक होण्याची शक्यता नाही,’’ असे सावंत यांनी सांगितले. सावंत पुढे म्हणाले की, ‘‘एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ातच निवडणूक घेण्याची माझी इच्छा होती. परंतु इंडियन प्रीमियर लीगच्या काळात होत असल्यामुळे व्यवस्थापन समितीमधील काही मंडळींनी त्याला विरोध केला.’’
‘‘बीसीसीआयमधील काही घटना वेगाने घडत गेल्या आणि एमसीएमध्ये प्रा. रत्नाकर शेट्टी न्यायालयात गेल्यामुळे आम्हाला बाकीचे प्रश्न सोडविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही,’’ असे सावंत यांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्याची तिकिटे एका पदाधिकाऱ्याने काळा बाजारात विकल्याचा आरोप शेट्टी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केला होता. त्यानंतर एमसीएच्या व्यवस्थापन समितीने शेट्टी यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली होती. मग एमसीएच्या व्यवस्थापन समितीविरोधात शेट्टी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याच कालखंडात स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरण आयपीएलमध्ये बाहेर आल्यामुळे अजय शिर्के यांनी बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सावंत यांच्याकडे प्रभारी कोषाध्यक्षपद चालून आले.
शरद पवार एमसीएच्या आगामी निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत, याविषयी विचारले असता सावंत म्हणाले की, ‘‘अध्यक्षपदावर परतण्याची आपली इच्छा पवार यांनी प्रदर्शित केली आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा