विद्यमान अध्यक्ष अजय शिर्के, माजी रणजीपटू व माजी चिटणीस अनंत माटे यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर (एमसीए) बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेच्या कार्यकारिणीच्या विभागीय १५ जागांकरिता १६ जणांचे अर्ज आल्यामुळे त्याकरिता निवडणूक १ एप्रिल रोजी होणार आहे. आगामी पाच वर्षांकरिता ही निवड आहे, अशी माहिती संघटनेचे चिटणीस सुधाकर शानबाग यांनी दिली.
संघटनेच्या आजीव सदस्य, आश्रयदाते व हितचिंतक विभागाकरिता असलेल्या तीन जागांकरिता विकास काकतकर, अभय आपटे व माधव रानडे या तिघांचेच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली
आहे.
क्लबच्या तीन प्रतिनिधींकरिता रियाज बागवान, आर. आर. देशपांडे व अजय शिर्के यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थापक जिमखाना विभाग गटात विजयकुमार ताम्हाणे, अजय गुप्ते व राहुल ढोले-पाटील यांची निवड झाली आहे तर महाविद्यालयीन व विशेष जिमखाना विभागातून अनंत माटे व प्रियांका थोरवे यांची निवड झाली आहे.
एमसीएशी संलग्न असलेल्या जिल्हा संघटनांच्या १५ जागांकरिता चिटणीस सुधाकर शानबाग, ज्येष्ठ क्रिकेटपटू पांडुरंग साळगांवकर यांच्यासह प्रमोद क्षिरे, धनपाल शहा, युवराज पाटील, प्रदीप देशमुख, अरुण जगताप, सचिन मुळ्ये, रवींद्र बिनीवाले, दत्तात्रय बंडगर, आर. ए. पाटणकर, चंद्रकांत मते, उदय सामंत, कमलेश ठक्कर, शामकांत देशमुख, अशोक तेरकर हे सोळा उमेदवार रिंगणात आहेत. १ एप्रिल रोजी ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. ही निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस या पदाधिकाऱ्यांसह नवीन कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा