मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीचे ‘पॉवर’वॉर प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत रंगतदार ठरले. आता बुधवारी, १७ जूनला १७ जागांसाठी ३४ उमेदवार आपले नशीब अजमावणार असून ३२६  मतदार मुंबई क्रिकेटचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यामुळे क्रिकेटजगतामध्ये एमसीएच्या निवडणुकीची आणि बुधवारी रात्री लागणाऱ्या निकालाची मोठी उत्सुकता आहे. एमसीएचे अध्यक्षपद अनेक वष्रे भूषवणाऱ्या शरद पवार यांना आपले पद टिकवण्यासाठी या वेळी ‘क्रिकेट फर्स्ट’च्या डॉ. विजय पाटील यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. पवार सोबतीला असलेल्या बाळ म्हाडदळकर गटासह भाजप आणि पाटील यांच्यासोबत शिवसेना पक्षाची साथ लाभल्यामुळे या निवडणुकीला वेगळे राजकीय महत्त्व लाभले आहे.
एमसीए निवडणुकीच्या प्रचाराची राजकीय खडाजंगी गेला आठवडाभर रंगते आहे. पवार, प्रताप सरनाईक, आशीष शेलार, राहुल शेवाळे ही राजकीय मंडळी रिंगणात असल्यामुळे त्यांची भाषणे, आरोप-प्रत्यारोप या निवडणुकीची लज्जत वाढवत आहे; परंतु पाटील यांच्या पाठीशी राहणारे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि म्हाडदळकर गटाचे कर्णधार पवार यांची भाषणे मतदारांना भावनिक आवाहन करणारी होती.
उपाध्यक्षपदासाठी म्हाडदळकर गटाकडून भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि शेलार हे दोन उमेदवार आहेत, तर ‘क्रिकेट फर्स्ट’कडून शिवसेना आमदार सरनाईक आणि माजी क्रिकेटपटू अॅबी कुरुविल्ला यांनी त्यांना आव्हान दिले आहे. कोषाध्यक्षपदासाठी म्हाडदळकर गटाच्या नितीन दलाल आणि मयांक खांडवाला यांच्यात थेट लढत आहे. याशिवाय संयुक्त सचिव पदाच्या दोन जागांसाठी म्हाडदळकर गटाकडून अनुभवी रवी सावंत आणि पी. व्ही. शेट्टी रिंगणात आहेत, तर प्रतिस्पर्धी गटाकडून माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि उमेश खानविलकर यांचे आव्हान उभे ठाकले आहे.
कार्यकारिणी सदस्याच्या ११ जागांसाठीसुद्धा अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. म्हाडदळकर गटाकडून विनोद देशपांडे, दीपक मुरकर, नवीन शेट्टी, पंकज ठाकूर, तर ‘क्रिकेट फर्स्ट’कडून प्रवीण अमरे, नदीम मेमन, संजय पाटील, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, दाऊद पटेल अशी तगडी मंडळी लढत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अल्पसंख्याक’ मुद्दा महत्त्वाचा
एमसीएच्या बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत ‘अल्पसंख्याक’ हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. या निवडणुकीतील एकंदर ३४ उमेदवारांपैकी ४ जण अल्पसंख्याक समाजाचे आहेत. याचप्रमाणे ३२६ मतदारांपैकी जवळपास २७ जण हे या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. सध्या निवडणुकीतील दोन्ही गटांकडे अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व असले तरी नदीम मेमन हे मतदारांचा विश्वास जिंकू शकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाळ  म्हाडदळकर  पॅनल
अध्यक्ष -शरद पवार
उपाध्यक्ष (२) :  दिलीप वेंगसरकर ,आशीष शेलार
कोषाध्यक्ष (१) : नतीन दलाल
संयुक्त सचिव (२) : डॉ. पी. व्ही. शेट्टी , रवी सावंत

कार्यकारिणी सदस्य (११)
विनोद देशपांडे
गणेश अय्यर
दीपक मुरकर
नवीन शेट्टी
पंकज ठाकूर
शाह आलम शेख
अरविंद कदम
रमेश वाजगे
श्रीकांत तिगडी
दीपक पाटील
अरमान मलिक

क्रिकेट  फर्स्ट  पॅनल
अध्यक्ष –विजय पाटील
उपाध्यक्ष (२): प्रताप सरनाईक , अ‍ॅबी कुरुविल्ला
कोषाध्यक्ष  :  मयांक खांडवाला
संयुक्त सचिव (२) : लालचंद राजपूत,उमेश खानविलकर
कार्यकारिणी सदस्य (११)
प्रवीण अमरे
जगदीश गवांडे
दीपक जाधव
संगम लाड
नदीम मेमन
दाऊद पटेल
संजय पाटील
राजेंद्र फातर्पेकर
सुरज समत
इक्बाल शेख
राहुल शेवाळे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca elections held today
Show comments