नकटीच्या लग्नाला जशी सतराशे विघ्न येतात, तशीच एकामागून एक विघ्ने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीपुढे येत होती. पण अखेर सोमवारी झालेल्या एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, दसऱ्यानंतर म्हणजेच १८ ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
‘‘एप्रिलमध्ये निवडणूक होणार होती, पण त्यावेळी आयपीएलची धामधूम होती.
त्याचवेळी स्पॉट-फिक्सिंग प्रकरण बाहेर आले. त्यानंतर १० जूनला मला बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मग रत्नाकर शेट्टी हे एमसीएविरुद्ध न्यायालयात गेले आणि हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे आता जास्त विचार न करता १८ ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचे ठरवले आहे,’’ असे एमसीएचे अध्यक्ष रवी सांवत यांनी सांगितले.
निवडणुकीची तारीख ठरवल्यानंतर ४५ दिवसांचा अवधी देण्याचा नियम आहे. त्यानुसार गणेशोत्सव, पितृपक्ष आणि त्यानंतर दसऱ्यानंतर येणाऱ्या शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या मुहुर्तावर निवडणूक होणार आहे.

क्रिकेटपेक्षा देशालाच प्राधान्य -सावंत
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स  लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी पाकिस्तानचा ‘फैसलाबाद व्होल्व्हज’ हा स्थानिक क्रिकेटमधील अव्वल संघ सहभागी होणार असल्याचे वृत्त सर्वत्र परसलेले असताना क्रिकेटपेक्षा देशालाच प्राधान्य द्यायला हवे, असे मत एमसीएचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष रवी सावंत यांनी व्यक्त  केले आहे. ते यासंदर्भात म्हणाले की, ‘‘याबाबतचा निर्णय बीसीसीआयची कार्यकारिणी समिती घेईल, याबाबत मी भाष्य करणे उचित ठरणार नाही. पण याबाबतचे माझे वैयक्तिक मत विचाराल तर मी क्रिकेटपुढे देशालाच प्राधान्य देईल.’’

निवडणुकीची प्रक्रिया
१७ सप्टेंबर : क्लब्सना आपला प्रतिनिधी मतदार
कळवण्याची अंतिम तारीख
११ ऑक्टोबर : अर्ज भरण्याची अंतिम तारीख
१२ ऑक्टोबर : अर्जाची छानणी
१५ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख