शरद पवार गटातील आधारस्तंभ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) खेळ विकास महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या(एमसीए) निवडणुकीसाठी नाकाबंदी करण्यासाठी सध्या एमसीए प्रयत्नशील असल्याचे समजते. आगामी निवडणुकीसाठी एमसीएने आपल्या नियमांमध्ये बदल केले असून त्यानुसार शेट्टी यांना सहजासहजी निवडणूक लढवता येणार नाही.
सोमवारी झालेल्या एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीमध्ये, बीसीसीआय, एमसीए, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि आयपीएलमधील कर्मचाऱ्यांना निवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या नियामानुसार शेट्टींना कोर्टातील याचिकेने दिलासा मिळाला तरी त्यांना एमसीएची निवडणूक लढवता येणार नाही.
गेली तीस वर्षे शेट्टी हे एमसीएमध्ये कार्यरत होते, सध्या ते बीसीसीआयचे खेळ विकास व्यवस्थापक या पदावर काम करीत आहेत. त्यानुसार शेट्टी नवीन नियमांनुसार निवडणुकीसाठी पात्र ठरणार नाहीत. कारण दुसरीकडे शरद पवार एमसीएची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे. एमसीएमधील निवडणूक जिंकून बीसीसीआयमध्ये जाण्यासाठी पवार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहेत. निवडणुकीसाठी पात्र ठरण्यासाठी पवार यांनी काही महिन्यांपूर्वीच आपला बारामतीचा पत्ता बदलला असून मुंबईच्या निवासाचा पत्ता सादर केला आहे. त्यामुळे निवडणूक लढवताना त्यांना शेट्टी यांची मदत होणार असल्याने त्यांना निवडणुकीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न एमसीए करीत असल्याचे म्हटले जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्याच्या तिकिटांचा एमसीएच्या अधिकाऱ्यांनी काळाबाजार केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. हा आरोप सिद्ध करण्यासाठी एमसीएने त्यांना मुदत दिली होती, पण या मुदतीमध्ये त्यांना सबळ पुरावे देता आले नसल्याने त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय एमसीएने घेतला होता. या निर्णयाविरोधात शेट्टी यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर एमसीए नजर ठेवून असून या सुनावणीनंतरच ते निवडणुकीच्या तारखा ठरवणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा